ख्रिसमस म्हणजे बाह्य उत्सव नव्हे तर ज्यांच्या जीवनात कांहीच नाही अशा निराधार -गरजूंना मदत करणे हे ख्रिसमस आपल्याला सांगतो आणि म्हणूनच आपण सर्वांनी गरीब, उपेक्षित आणि निराधारांना मदत करणे ही काळाची गरज बनली आहे, असा संदेश बेळगावचे बिशप रेव्ह. डेरेक फर्नांडिस यांनी दिला आहे.
जगभरातील ख्रिश्चन बांधवांचा नाताळ अर्थात क्रिसमस हा सण आज मध्यरात्रीपासून उद्या रविवार दि. 25 डिसेंबर रोजी साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर बेळगाव शहरवासीयांना ख्रिसमस सणानिमित्त शुभेच्छापर संदेश देताना बिशप रेव्ह. फर्नांडिस बोलत होते.
त्यांनी येशू ख्रिस्ताच्या जन्माची माहिती देऊन नाताळ सणाचा खरा अर्थ सांगण्याबरोबरच रस्त्यावर चालताना वंचित आणि गरीब बालके व नागरिकांची चौकशी करून त्यांना मदत करण्याचे आवाहन केले. जर येशू ख्रिस्ताचा आज जन्म झाला असता, तर तो लहान मुलाच्या रूपात जिथे हजारो लहान बाळांना त्रास सहन करावा लागतो त्या फूटपाथवर जगाच्या पाठीवर कुठेतरी जन्माला आला असता. येशू ख्रिस्ताचा जन्म गुरे-मेंढ्यांच्या गोठ्यात झाला.
तथापि आज फुटपाथवर जन्म घेऊन त्याने असे म्हंटले असते की बालपणी त्याला जे त्रास सहन करावे लागले ते त्रास सध्या शहरातील फूटपाथवरील मुले जो त्रास सोसतात त्याच्या तुलनेत खूपच कमी होते, असे बिशप फर्नांडिस यांनी सांगितले.
इतरांच्या अडीअडचणींकडे त्यांच्या त्रासाकडे दुर्लक्ष करणे हा आजच्या घडीला संपूर्ण मनुष्य जातीला मिळालेला मोठा शाप आहे. तेंव्हा सर्वांनी गरीब, उपेक्षित आणि निराधारांना मदत करून ख्रिसमस साजरा करावा असे आवाहन बिशप रेव्ह. डेरेक फर्नांडिस यांनी केले.