बेळगाव शहरातील पासपोर्ट कार्यालयामध्ये अलीकडे गर्दी होत असून गेल्या 8 महिन्याच्या कालावधीत 9,401 जणांनी आपले पासपोर्ट काढून घेतले आहेत.
बेळगाव शहर व परिसरातील नागरिकांची गरज लक्षात घेऊन गेल्या 14 फेब्रुवारी 2018 रोजी बेळगाव येथील मुख्य टपाल कार्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावर पासपोर्ट कार्यालय सुरू करण्यात आले आहे. सध्या टपाल कार्यालयाच्या मागील बाजूला पासपोर्टसाठी स्वतंत्र कार्यालय सुरू आहे.
या पासपोर्ट कार्यालयात फक्त बेळगावच नाही तर महाराष्ट्रातील तसेच जवळच्या तालुक्यातील अनेक नागरिक पासपोर्ट काढून घेत आहेत. त्यामुळे पासपोर्ट कार्यालयाच्या ठिकाणी रोजच गर्दी पहावयास मिळत आहे. या कार्यालयात दररोज 160 जणांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाते.
बेळगाव पासपोर्ट कार्यालयामध्ये 1 एप्रिल 2022 ते 30 नोव्हेंबर 2022 या आठ महिन्यांच्या कालावधीत 9,401 जणांनी पासपोर्ट काढून घेतले आहेत.
तत्पूर्वी 2018 पासून 50,000 हून अधिक जणांनी पासपोर्ट सेवेचा लाभ घेतला आहे. यापूर्वी पासपोर्ट काढण्यासाठी हुबळीला जावे लागत होती. मात्र 4 वर्षापासून बेळगावच पासपोर्टची सेवा उपलब्ध असल्याने नागरिकांची चांगली सोय झाली आहे.