बेळगाव महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी आता नवा मुहूर्त शोधण्यात आला असून येत्या जानेवारीच्या पहिल्या पंधरवड्यात निवडणूक होईल, असे शहराच्या दोन्ही आमदारांकडून नगरसेवकांना सांगण्यात आले आहे.
महापौर निवडणूक होत नसल्याने अस्वस्थ झालेल्या भाजप नगरसेवकांची बैठक काल शुक्रवारी महावीर भवन येथे आयोजित करण्यात आली होती. शहराच्या दोन्ही आमदारांनी ही बैठक बोलावली होती. महापालिका निवडणूक होऊन पंधरा महिन्यांचा कालावधी लोटला आहे. महापालिकेत भाजपला पूर्ण बहुमत असूनही अद्याप महापौर निवडणूक झालेले नाही. यापूर्वी गेल्या ऑगस्ट पूर्वी निवडणूक होईल असे जाहीर करण्यात आले होते आता येत्या 6 किंवा 9 जानेवारीला निवडणूक होईल असे जाहीर करण्यात आले आहे.
महापौर निवडणुकीतील कायदेशीर अडचण दूर झाल्याचे अधिकाऱ्यांनी ही सांगितले आहे. ॲडहोकेट जनरलांचे मत विचारात घेऊन सरकार व निवडणूक आयोग निवडणुकीचा कार्यक्रम येत्या तीन-चार दिवसात जाहीर करेल अशी माहितीही या बैठकीत उपस्थित आमदारांनी दिली.
दरम्यान, बेळगावमध्ये येत्या 19 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळ अधिवेशनात बेळगावच्या प्रलंबित महापूर निवडणुकीचा मुद्दा चर्चेला येऊ शकतो. महापौर निवडणुकीच्या बाबतीत विरोधी नगरसेवकही आक्रमक झाले आहेत. आमदार सतीश जारकीहोळी यांनी दोन दिवसापूर्वी महापालिकेत जाऊन विरोधी नगरसेवकांची चर्चा केली आहे
. आता कालच्या बैठकीत येत्या जानेवारीत महापौर -उपमहापौर निवडणूक होणार असल्याचे जाहीर करण्यात आल्यामुळे यावेळी तरी ही निवडणूक होणार का? याकडे नगरसेवकांचे लक्ष लागले आहे.