बेळगाव जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या अत्यंत कमी होऊन लोकांची कोरोना बाबतचे भीतीयुक्त कुतूहलही लुप्त झाले आहे. त्यामुळे कोरोना लसीकरणालाही प्रतिसाद कमी झाला असला तरी दोन महिन्यापूर्वीच जिल्ह्यात लसीकरणाचा 89 लाखांचा टप्पा पूर्ण झाला आहे.
यंदा पावसाळ्यानंतर पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढला होता. मात्र करोनाची ही चौथी लाट देखील नियंत्रणाखाली आली. परिणामी कोरोना लस घेण्यास पुढे येणाऱ्यांची संख्या घटली. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने सर्वांनाच कोरोनाचा बूस्टर डोस मोफत देण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला होता. तथापि या योजनेलाही अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही.
डोस देण्यास सुरुवात झाल्यापासून जिल्ह्यातील केवळ 7 लाख 17 हजार 669 जणांनीच हा बूस्टर डोस घेतला आहे. बेळगाव जिल्हा आकाराने मोठा असला तरी लसीकरणात हा जिल्हा प्रारंभापासूनच आघाडीवर राहिला आहे. बेंगलोर शहरापाठोपाठ बेळगाव जिल्ह्यात सर्वाधिक कोरोना प्रतिबंधक लसीकरण झाले आहे.
बेळगाव जिल्ह्यात लसीकरण झालेल्यांची एकूण संख्या 89 लाख 19 हजार 533 इतकी असून बुस्टर डोस घेतलेल्यांची संख्या 7 लाख 17 हजार 699 इतकी आहे. कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतलेल्या जिल्ह्यातील 12 ते 14 वयोगटातील मुलांची संख्या 1 लाख 88 हजार 91 इतकी, तर दुसरा डोस घेतलेल्या 12 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांची संख्या 1 लाख 77 हजार 662 इतकी आहे.
याचप्रमाणे लसीचा पहिला डोस घेतलेल्या 15 ते 17 वर्षे वयोगटातील मुलांची संख्या 2 लाख 32 हजार 764 इतकी असून दुसरा डोस घेतलेल्या मुलांची संख्या 2 लाख 26 हजार 793 इतकी आहे.