विधानसभा व सभागृहाबाहेर केलेली बेताल वक्तव्य पाहता महाराष्ट्राच्या विरोधी पक्ष नेत्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे असा संशय येत असल्याची टीका मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी बेळगावात पत्रकारांची बोलताना केली.
शहरात काल बुधवारी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले, महाराष्ट्रातील विरोधी पक्ष सीमाप्रश्नाच्या मुद्द्यावर राजकारण करत आहेत. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसने राजकीय फायदा उठवण्याचा प्रयत्न केला तो अपयशी ठरला.
दोन्ही राज्यातील लोक शांतता आणि सौहार्द राखत आहेत. मात्र वातावरण गढूळ करण्याचे प्रकार सुरू आहेत. जनतेचा पाठिंबा नसला तरी पक्षांचे झेंडे घेऊन आंदोलन करत आहेत. त्यामुळे हे राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे स्पष्ट होते असे त्यांनी सांगितले.
राज्यातील काँग्रेस नेत्यांनी महाराष्ट्रातील नेत्यांशी चर्चा करावी अशी सूचना केली आहे. हा मुद्दा रस्त्यावर सोडवता येणार नाही. केंद्रीय गृहमंत्र्यांनी देखील तेच सांगितले आहे. महाराष्ट्र सीमाप्रश्न न्यायालयात घेऊन गेला आहे. आपली बाजू कमकुवत असल्याचे त्यांना जाणवले आहे. त्यामुळे अशी परिस्थिती निर्माण करून फायदा उठवण्याचा प्रयत्न सुरू असला तरी त्यात त्यांना यश मिळणार नाही.
महाराष्ट्र विधान सभेतील विरोधी पक्ष नेत्यांचे कर्नाटकावर चीन प्रमाणे आक्रमण केले जाईल हे वक्तव्य अपरिपक्वतेचे लक्षण आहे. मात्र कर्नाटक हे भारताप्रमाणे सक्षम आहे हे वास्तव त्यांना माहीत नाही. भारतीय लष्कराने चीनच्या सैन्याला जसे परतवून लावण्यात आले तसे कर्नाटक पोलीस महाराष्ट्राच्या आंदोलनकर्त्यांना माघारी धाडतील. कन्नडीग त्यासाठी सक्षम आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील विरोध पक्ष नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांच्या बैठकीला कांही अर्थ नसल्याचे जे वक्तव्य केले आहे त्या संदर्भात बोलताना सदर बाब गृहमंत्री अमित शाह यांच्या निदर्शनास आणून दिली जाईल असे सांगून दोन्ही राज्यात शांतता असावी असा निर्णय त्या बैठकीत झाला आहे. त्यानुसार शांतता व सुव्यवस्था राखण्यात आली आहे. एकही अनुचित प्रकार घडू नये याची दक्षता घेतली आहे. महाराष्ट्रानेही तसे करणे महत्त्वाचे आहे. आम्ही कोणत्याही बेकायदेशीर कारवाया खपवून घेणार नाही आणि विधानसभेत याबाबत चर्चा होऊन विधेयकही मंजूर केले जाईल, असे मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले.
महाराष्ट्रातून पाणी सोडले जाणार नाही आणि धरणांची उंची वाढवली जाईल, या महाराष्ट्रातील नेत्यांच्या विधानाला उत्तर देताना ते म्हणाले, नद्यांचे पाणी वाटप आंतरराज्य जलविवाद कायद्यानुसार चालते. महाराष्ट्रातील नेत्यांनाही त्याची जाणीव आहे. केवळ राजकीय दृष्ट्या प्रेरित विधाने केली जात आहेत असे सांगून मुसळधार पाऊस पडल्यानंतर पाणी थांबवणे शक्य आहे का? असा प्रश्न मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केला. तसेच न्यायाधिकरणाने अलमट्टी धरणाची उंची 524.5 मीटर पर्यंत वाढवावी असा आदेश दिला आहे. त्या संदर्भात अधिसूचना जारी केल्यानंतर लवकरच कामाला सुरुवात केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. पंचमसाली समाजाच्या कोट्याबाबत जारी करण्यात आलेल्या अंतिम मुदतीकडे लक्ष वेधले असता मुख्यमंत्र्यांनी ते सर्व आपलेच लोक आहेत. मी मागासवर्ग आयोगाचे चेअरमन आणि सदस्यांच्या संपर्कात आहे. त्यांना लवकरात लवकर अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले असून अहवाल हाती येताच सरकार योग्य ती पावले उचलेल असे त्यांनी सांगितले.