मनपा आयुक्तांच्या सूचनेत बदल करून राज्य विधिमंडळाच्या येत्या 12 डिसेंबरपासून बेळगाव सुरू होणाऱ्या अधिवेशन काळात हॉटेल्सच्या 90 टक्के खोल्या आरक्षित ठेवण्याची सूचना जिल्हाधिकारी (डीसी) नितेश पाटील यांनी केल्यामुळे हॉटेल मालकांना दिलासा मिळाला आहे.
गेल्या महिन्यात महापालिकेमध्ये हॉटेल मालकांच्या झालेल्या बैठकीत 100 टक्के खोल्या अधिवेशनासाठी आरक्षित ठेवण्याची सूचना आयुक्त डॉ. रुद्रेश घाळी यांनी दिली होती. त्यामुळे हॉटेल मालकांमध्ये नाराजी पसरली होती. तथापि काल गुरुवारी जिल्हाधिकार्यालयामध्ये झालेल्या बैठकीत 10 टक्के खोल्या अनारक्षित ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे.
त्यामुळे आता अधिवेशन काळात बेळगावत येणाऱ्या पर्यटकांना शहरातील हॉटेलमध्ये खोल्या मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कालच्या बैठकीत गतवर्षीचे थकीत भाडे लवकरच दिले जाईल. शिवाय यंदा अधिवेशन संपल्यानंतर महिन्याभरात सर्व हॉटेल मालकांना भाडे देण्याची ग्वाहीही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
अधिवेशन काळात हॉटेल्समधील खोल्यांचा कब्जा घेणे त्या खोल्यांचे वाटप करणे ही जबाबदारी महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. संजय डुमगोळ आणि सहाय्यक कार्यकारी अभियंता हनुमंत कलादगी यांच्याकडे देण्यात आली आहे. तसेच महापालिकेकडून खोल्यांचे वाटप होण्याआधी पोलीस आयुक्तांसोबत चर्चा करण्याचा निर्णय कालच्या बैठकीत झाला.
गतवर्षी अधिवेशनासाठी हॉटेल मालकांनी सर्व खोल्या दिल्या नसल्यामुळे काही अधिकार्यांची गैरसोय झाली होती. त्यामुळे यंदा सर्व हॉटेल्स मधील सर्व खोल्यांचा ताबा घेण्याचे निश्चित करण्यात आले होते. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी 90 टक्के खोल्या आरक्षित ठेवण्याची सूचना करून हॉटेल मालकांना दिलासा दिला आहे.