बेळगाव सुवर्णसौध येथे हिवाळी अधिवेशन भरविण्यात येणार असून या निमित्ताने बेळगावमधील विविध ठिकाणी विकासकामांची लगबग युद्धपातळीवर सुरु झाली आहे. कोट्यवधी रुपयांच्या खर्चातून भरविण्यात येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात गोंधळाव्यतिरिक्त काहीच साध्य होत नाही. मात्र बेळगावमध्ये संपूर्ण राज्यातील मंत्रीमहोदयांचे आगमन होत असल्याने विविध ठिकाणी विकासकामे हाती घेण्यात आली आहेत.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील रस्ते कामांना प्रारंभ करण्यात आला असून याठिकाणी रस्ते, गटारी, शेड आणि पार्किंग व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येत आहे. सुमारे एक कोटी रुपयांच्या खर्चातून सदर विकासकामे होत असून यामुळे झाडांचीही कत्तल होत असल्याचे निदर्शनात आले आहे.
मंगळवारी सुरु केलेल्या विकासकामादरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील दोन वृक्षांची कत्तल करण्यात आल्याने हा परिसर ओसाड दिसू लागला आहे. जिल्हाधिकारी कार्यालय आवारात जिल्हा पंचायत, प्रांताधिकारी कार्यालय, जिल्हा ग्रंथालय, प्रादेशिक आयुक्त कार्यालय, माहिती कार्यालय यासह अनेक महत्वाची कार्यालये आहेत. येथील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय अशी झाली असून येथील अपघातांच्या प्रमाणातही वाढ झाली आहे.
स्मार्ट सिटी, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि बुडा यांच्या वतीने सदर विकासकामे हाती घेण्यात आली असून यासाठी १ कोटी रुपये निधीही मंजू करण्यात आला असून यातील ७० लाख रुपये रस्तेविकासासाठी खर्च होणार आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील कोर्ट रोड ते जिल्हा पंचायत आणि जिल्हाधीकारी कार्यालय ते जिल्हा ग्रंथालय, काकतीवेस, प्रांताधिकारी कार्यालय परिसरातील रस्त्यांचा समावेश आहे. प्रांताधिकारी कार्यालयासमोर चारचाकी आणि दुचाकीसाठी पार्किंग व्यवस्था करण्यात येत आहे तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनकर्त्यांसाठी शेड उभारण्यात येत आहे.
केवळ रस्ते, गटारी, पथदीप याच नावावर विकासाची व्याख्या न ठरवता जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातूनही जिल्हा प्रशासनाने आगेकूच करावी, विकासकामादरम्यान सर्वसामान्य जनतेला वेठीला धरू नये, निसर्ग संरक्षणाचे भान राखावे, अशी मागणी सर्वसामान्य नागरीकातून होत आहे.