उचगाव (ता. जि. बेळगाव) येथील क्रीडांगणावर उचगाव फुटबॉल क्लबतर्फे आयोजित फुटबॉल स्पर्धेच्या अजिंक्यपदासह रोख 22000 रुपयांचे बक्षीस बेळगावच्या फास्ट फॉरवर्ड संघाने हस्तगत केले आहे.
उचगाव फुटबॉल क्लब आयोजित फुटबॉल स्पर्धा गेल्या रविवारी यशस्वीरित्या पार पडली. सदर स्पर्धेत बेळगाव, खानापूर व चंदगड तालुक्यातील एकूण 32 फुटबॉल संघाने भाग घेतला होता. उचगाव मैदानावर झालेल्या स्पर्धेच्या चुरशीच्या अंतिम सामन्यात फास्ट फॉरवर्ड संघाने प्रतिस्पर्धी किंग ब्रदर्स संघावर 2 -0 अशा गोल फरकाने विजय मिळवला.
अंतिम सामन्यानंतर आयोजित बक्षीस वितरण समारंभ उचगाव ग्रामपंचायत अध्यक्ष जावेद जमादार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. उचगाव फुटबॉल क्लबचे संस्थापक अध्यक्ष प्रणाम राणे, विनायक चौगुले यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
याप्रसंगी विजेत्या फास्ट फॉरवर्ड संघाला रोख 22000 रुपये आणि करंडक तर उपविजेत्या किंग ब्रदर्स संघाला 11000 रुपये व चषक बक्षीस दाखल देऊन गौरविण्यात आले. त्याचप्रमाणे पंच कौशिक पाटील यांचाही सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी एल. डी. चौगुले, बळवंत पावशे, बाळकृष्ण तेराशे, उमेश शिंदोळकर, महेश देसाई, गजानन बांदिवडेकर, पवन देसाई, सुरेश चौगुले, शशिकांत जाधव, विनायक मेलगे, राकेश बांदिवडेकर आदींसह बहुसंख्या फुटबॉल शौकीन उपस्थित होते. शेवटी सेवानिवृत्त मुख्याध्यापक एन. ओ. चौगुले यांनी सर्वांचे आभार मानले.