कारखान्याकडे ऊस घेऊन जाणारा एक ट्रक अचानक टायर फुटल्यामुळे पलटी झाल्याची घटना आज बुधवारी सकाळी पुना -बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 वर हलगा गावानजीक घडली. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.
बागेवाडी येथून ऊस भरून एक ट्रक आज बुधवारी सकाळी महाराष्ट्रातील साखर कारखान्याकडे निघाला होता. मात्र पुना -बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 वर हलगानजीक या ट्रकचा एक टायर अचानक फुटला परिणामी चालकाचे ट्रक वरील नियंत्रण सुटून तो भर रस्त्यात पलटी झाला.
यावेळी प्रसंगावधान राखून ट्रक चालक व क्लीनरने आपला जीव वाचविला. उसाने भरलेला ट्रक टायर फुटून अनियंत्रित झाल्याचे लक्षात येताच मागून येणाऱ्या वाहन चालकांनी आपल्या वाहनांचा वेग नियंत्रणात आणून ती जागीच थांबविल्यामुळे पुढील अनर्थ टळला.
ट्रक पलटी झाल्यामुळे त्यातील ऊस रस्त्यावर विखरून पडला होता. भर रस्त्यात कलांडून पडलेला ट्रक आणि रस्त्यावर पसरलेला ऊस यामुळे या मार्गावरील वाहतुकीस कांही काळ अडथळा निर्माण झाला होता.
सदर अपघाताची माहिती मिळताच हिरेबागेवाडी पोलिसांनी लागलीच घटनास्थळी धाव घेतली. तसेच जेसीबीच्या सहाय्याने पसरलेला ऊस आणि पलटी झालेला ट्रक रस्त्यावरून हटवून या मार्गावरील वाहतूक अल्पावधीत पुनश्च सुरळीत केली.