बेळगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या बेळगाव रिंग रोडच्या विरोधातील येत्या 28 नोव्हेंबर रोजीच्या शेतकऱ्यांच्या भव्य चाबूक मोर्चाला पाठिंबा द्यावा, अशा विनंतीचे निवेदन बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे एपीएमसी मार्केट यार्ड येथील व्यापारी संघटनेला सादर करण्यात आले आहे. त्यावेळी व्यापाऱ्यांनी मोर्चाला आपला संपूर्ण पाठिंबा व्यक्त केला.
बेळगावचा नियोजित रिंग रोड प्रकल्प तात्काळ रद्द करण्यात यावा या मागणीसाठी बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली बेळगाव येत्या 28 नोव्हेंबर रोजी शेतकऱ्यांचा विराट चाबूक मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा मोठा प्रमाणात यशस्वी करून सरकारचे लक्ष वेधण्यासाठी विविध संघ -संस्था आणि संघटनांचा पाठिंबा मिळविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकारी व सदस्यांच्या शिष्टमंडळाने कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर यांच्या नेतृत्वाखाली बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती अर्थात एपीएमसी मार्केट यार्ड येथील व्यापारी पदाधिकाऱ्यांसह व्यापाऱ्यांची भेट घेऊन चाबूक मोर्चाला पर्यायाने शेतकऱ्यांना पाठिंबा देण्याची विनंती केली. तसेच तशा आशयाचे निवेदन त्यांना सादर केले. याप्रसंगी म. ए. समितीचे नेते शिवाजी सुंठकर, युवा नेते एम जी पाटील ॲड. एम. जी. पाटील, एस. एल. पाटील, आर आय पाटील आदींसह व्यापारी उपस्थित होते.
यावेळी बेळगावातील वाहतूक समस्या निवारण्यासाठीच्या रिंग रोडमुळे संबंधित 32 गावातील शेतकरी कसे देशोधडीला लागणार आहेत. त्याचप्रमाणे रिंग रोड ऐवजी फ्लाय ओव्हर ब्रिजचा पर्याय कसा योग्य आहे, याबाबतची माहिती माजी आमदार मनोहर किणेकर यांनी एपीएमसी मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांना दिली. यावेळी उपस्थित व्यापारी संघटनेचे पदाधिकारी आणि व्यापाऱ्यांनी येत्या 28 नोव्हेंबर रोजीच्या शेतकऱ्यांच्या चाबूक मोर्चाला आपला पाठिंबा असल्याचे जाहीर केले.
येळ्ळूर येथे शुक्रवारी ‘रिंगरोड’विरोधात जनजागृती बैठक
येळळूर दि. 22- ‘रिंगरोड’विरोधात सोमवार दिनांक 28 रोजी नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘चाबूक मोर्चा’ काढण्याचा निर्णय तालुका म. ए. समितीने घेतला आहे. सदर मोर्चाला पाठिंबा देऊन जनजागृती करण्यासाठी येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने शुक्रवार दिनांक 25 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता श्रीचांगळेश्वरी देवालयात ‘जनजागृती सभे’चे आयोजन करण्यात आले आहे.
या जनजागृती सभेला मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे उपाध्यक्ष भाई राजाभाऊ पाटील, तालुका महाराष्ट्र एकीकरण समितिचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर, मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे खजिनदार श्री. प्रकाश मरगाळे, सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर, कॉ. आनंद मेणसे, सामाजिक कार्यकर्ते श्री. शिवाजी कागणीकर, तालुका महाराष्ट्र युवा समितीचे अध्यक्ष संतोष मंडलिक, तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस अॅड. एम. जी. पाटील, उपाध्यक्ष अॅड. सुधीर चव्हाण, माजी महापौर शिवाजीराव सुंठकर, श्री. मनोज पावशे अॅड. श्याम पाटील, मार्कंडेय साखर कारखान्याचे नूतन संचालक आर. आय. पाटील, शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस विलास घाडी, युवानेते श्री. आर. एम. चौगुले इत्यादी तालुक्यातील नेते मंडळी मार्गदर्शन करणार आहेत, तरी येळ्ळूर विभागातील शेतकरी बांधव, शेतकरी सोसायटीचे संचालक, माजी जिल्हा पंचायत सदस्य, तालुका पंचायत सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष शांताराम कुगजी आणि चिटणीस प्रकाश अष्टेकर यांनी केले आहे.