बेळगाव महानगरपालिकेने शहरातील बैठे विक्रेते व फेरीवाल्यांना स्मार्ट ओळखपत्रासह क्यूआर कोड असलेले प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने ओळखपत्र व प्रमाणपत्र तयार करण्याच्या दृष्टीने प्रक्रिया सुरू झाली असून त्याचे कंत्राट देण्याकरिता महापालिकेने निविदा काढली आहे.
बेळगाव शहरातील बैठे विक्रेते व फेरीवाले यांना स्मार्ट ओळखपत्र दिले जाणार आहे. यासाठी त्यांचे जीपीएस प्रणालीच्या सहाय्याने सर्वेक्षण करणे, त्यांना स्मार्ट ओळखपत्र देणे, त्यांना क्यूआर कोड व जिओ टॅगिंग असलेले प्रमाणपत्र महापालिकेकडून दिले जाणार आहे.
सदर कामाचे कंत्राट देण्याकरिता निविदा काढण्यात आली असून ही प्रक्रिया पूर्ण होऊन ठेकेदार निश्चित होताच सर्वेक्षणाचे काम हाती घेतले जाणार आहे. केंद्र शासनाच्या नॅशनल अर्बन लाईव्हलीहुड मिशन अंतर्गत हे काम केले जाणार आहे. महापालिकेने वेळोवेळी केलेल्या सर्वेक्षणानुसार शहरात 10,263 विक्रेते व फेरीवाले आहेत. आता त्यांचे नव्याने सर्वेक्षण केले जाणार आहे. स्मार्ट ओळखपत्रामुळे बैठे विक्रेते व फेरीवाल्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेता येणार आहे, शिवाय क्यूआर कोड असलेल्या प्रमाणपत्राचाही विक्रेत्यांना लाभ होणार आहे.
रस्त्यावर बसून व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांचे राहणीमान सुधारण्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. यासाठी सर्व विक्रेत्यांची एक संघटनाही तयार करण्यात आली आहे. निवडणुकीच्या माध्यमातून त्यावर पदाधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.
गेल्या 2020 व 22 सालामध्ये केलेल्या सर्वेक्षणामुळे शहरातील विक्रेत्यांची नेमकी संख्या महापालिकेला मिळाली असून या सर्वांना ओळखपत्र मिळाले म्हणजे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून किंवा वाहतूक पोलिसांकडून त्यांना त्रास होणार नाही.