महाराष्ट्राचे दोन सीमाभाग समन्वय प्रभारी मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराजे देसाई हे येत्या 3 डिसेंबरला बेळगावला येत असल्यामुळे कन्नड नेत्यांचा तीळपापड झाला आहे. महाराष्ट्राचे दोन मंत्री बेळगावात येत असतील तर कर्नाटकच्या दोन जेष्ठ मंत्र्यांना महाराष्ट्रातील जत, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर आणि पंढरपूर येथे पाठवावे, अशी मागणी कन्नड संघटनांच्या कृती समितीचे जिल्हाध्यक्ष अशोक चंदरगी यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
ज्येष्ठ कन्नड कार्यकर्ते अशोक चंदरगी यांनी आज मंगळवारी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना यासंदर्भात पत्र लिहिले आहे. याबाबत पत्रकारांशी बोलताना अशोक चंदरगी म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयात कर्नाटक -महाराष्ट्र विवाद प्रकरणाची अंतिम सुनावणी पाहता महाराष्ट्र समर्थक शांततापूर्ण वातावरण बिघडवण्याचे सर्व प्रकारचे प्रयत्न कर्नाटकच्या सीमा भागात करत आहेत.
त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्राचे दोन सीमाभाग प्रभारी मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराजे देसाई हे येत्या शनिवारी 3 डिसेंबर रोजी बेळगावला येऊन येथील महाराष्ट्र एकीकरण समिती व शिवसेनेच्या नेत्यांची चर्चा करणार आहेत. सध्याच्या परिस्थितीत हे मंत्री बेळगावात येणे ही अत्यंत गंभीर बाब आहे.
महाराष्ट्रातील जत, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर आणि पंढरपूर या भागातील कन्नडीग स्थानिकांनी सरकारच्या विरोधात रणशिंग फुंकले आहे आणि कर्नाटकात सामील होण्याची तीव्र इच्छा ते प्रकट करत आहेत. कर्नाटक सरकारने त्यांना सर्व प्रकारचे सहकार्य करून त्यांचे मनोबल वाढवावे. त्या अनुषंगाने त्यांनी तातडीने दोन ज्येष्ठ मंत्र्यांना संबंधित भागातील कन्नडीगांची भेट घेऊन चर्चा करण्यास पाठवावे. अशी चाल खेळणे हेच महाराष्ट्रासाठी योग्य उत्तर आहे.
बेळगाव होणाऱ्या विधिमंडळाच्या अधिवेशना प्रसंगी गतवर्षीप्रमाणेच भाषिक एकोपा बिघडवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यामुळे सरकारने शक्य तितक्या खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात अशी मागणीही अशोक चंदरगी यांनी केली.