राज्यातील सर्व शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून प्रत्येक शाळेत सुरक्षा समिती स्थापन करण्याची सूचना शिक्षण खात्याने केली असून विद्यार्थ्यांना पोक्सो कायद्याची माहितीही उपलब्ध करून देण्यास सांगण्यात आले आहे.
अल्पवयीन विद्यार्थ्यांवर दिवसेंदिवस अन्याय वाढत असल्याचे समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर अल्पवयीन मुलांवरील लैंगिक अत्याचार थोपविण्यासाठी लागू करण्यात आलेला पोक्सो कायद्याअंतर्गत नियमावलीचे शिक्षण संस्था आणि काटेकोर पालन करावे, अशी सूचना कर्नाटक शिक्षण खात्याच्या आयुक्तांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांना केली आहे.
पोक्सो कायदा 2022 बरोबरच कर्नाटक बाल संरक्षण धोरण 2016 या कायद्याचेही काटेकोरपणे पालन करण्याचा आदेश बजावण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून शाळा पालक व विद्यार्थी यांची कोणती जबाबदारी आहे? याबाबतची माहिती ही शाळांना देण्यात आली आहे.
शाळांमध्ये शाळा सुधारणा समिती व विद्यार्थ्यांची बैठक बोलावून सुरक्षा समिती स्थापन करावी. तसेच ही समिती स्थापन केल्यानंतर त्याबाबतचा अहवाल शिक्षण खात्याला देण्याची सूचनाही करण्यात आली आहे.