बेळगावच्या नियोजित रिंग रोडसाठीचा आपला तीव्र विरोध कायम ठेवत येत्या दहा दिवसात रिंग रोडचा प्रस्ताव रद्द करण्यात यावा, अन्यथा येत्या 28 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांचा विराट मोर्चा काढला जाईल हा इशारा देण्याबरोबरच बेळगाव तालुका म. ए. समितीतर्फे मोर्चाच्या मार्गाची माहिती देणारे निवेदन आज बुधवारी सकाळी बेळगावच्या पोलीस आयुक्तांना सादर करण्यात आले.
बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किनेकर यांच्या नेतृत्वाखालील समितीच्या शिष्टमंडळाने सादर केलेल्या निवेदनाचा पोलीस आयुक्त डाॅ. एम. बी. बोरलिंगय्या यांनी स्वीकार केला. तसेच मोर्चा काढण्याचा प्रसंग आला तर तो शांततेत काढून कायदा व सुव्यवस्था भंग होणार नाही याची काळजी घ्यावी अशी सूचना केली.
नियोजित राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 -अ आणि बेळगाव रिंग रोड अन्यायकारक असल्यामुळे अगसगा, आंबेवाडी, बाची, बहाद्दरवाडी, बेळगुंदी, बिजगर्णी, गोजगे, होनगा, कडोली, काकती, कलखांब, कल्लेहोळ, कमकारट्टी, कणबर्गी, कोंडसकोप्प, मण्णूर, मास्तमार्डी, मुचंडी, मुतगा, नावगे संतीबस्तवाड, शगनमट्टी, शिंदोळी, सोनट्टी, सुळगे-येळ्ळूर, धामणे, तुरमुरी, उचगाव, वाघवडे, येरमाळ, येळ्ळूर व झाडशहापुर या गावातील शेतकऱ्यांच्या 1272 एकर (509.7677 हेक्टर) सुपीक शेत जमिनीचे भूसंपादन केले जाऊ नये, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हिंदू या इंग्रजी दैनिकात गेल्या 13 ऑक्टोबर रोजी प्रसिद्धीस दिलेल्या बेळगाव रिंग रोड भूसंपादनासंदर्भातील नोटिफिकेशनचा उल्लेख असून सदर रिंग रोड कसा अन्यायकारक आहे ते सविस्तर नमूद करण्यात आले आहे. भूसंपादित केल्या जाणाऱ्या सुपीक जमिनीत संबंधित गावातील शेतकरी कशा पद्धतीने सरकारच्या जलसिंचन योजनेच्या मदतीशिवाय ऊस रताळी, भात, भाजीपाला वगैरे दुबार पिके घेतात. हे शेतकरी जमीनदार नसून एक एकर, अर्धा एकर जमीन असलेले लहान शेतकरी आहेत. त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह या शेतजमिनीवर चालतो.
शेतजमीन गेल्यास त्यांच्यावर उपासमारीची वेळ येणार आहे. तेंव्हा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने बेळगावातील वाहतूक समस्या निकालात काढण्यासाठी रिंग रोड बांधण्याऐवजी त्या ठिकाणी फ्लाय ओव्हर ब्रिज उभारावा. त्यामुळे शेतकऱ्यांचे हित साधले जाईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे रिंग रोड पेक्षा फ्लावर उभारणीचा खर्चही कमी येईल. तरी येत्या 10 दिवसात रिंग रोडचा प्रस्ताव रद्द करण्यात यावा अन्यथा येत्या 28 नोव्हेंबर रोजी शेतकरी, त्यांची कुटुंबं, ट्रॅक्टर, टेम्पो आदींचा विराट मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येईल. त्यावेळी हजारोंच्या संख्येने शेतकरी मोर्चात सहभागी होणार असल्यामुळे जर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याला सर्वस्वी सरकारच जबाबदार राहील अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे.
बेळगाव रिंग रोडच्या विरोधात मोर्चाचा इशारा देण्याबरोबरच धर्मवीर संभाजी चौक, कॉलेज रोड, राणी चन्नम्मा सर्कल ते जिल्हाधिकारी कार्यालय या मोर्चाच्या मार्गाची माहिती निवेदनात नमूद आहे. निवेदन सादर करतेवेळी माजी आमदार मनोहर किनेकर यांच्या समवेत माजी महापौर शिवाजी सुंठकर, समिती नेते प्रकाश मरगाळे, ॲड. सुधीर चव्हाण, समितीचे जनसंपर्कप्रमुख विकास कलघटगी आदी उपस्थित होते