Thursday, December 26, 2024

/

सरदार मैदान फक्त खेळांसाठी राखीव ठेवण्याची मागणी

 belgaum

बेळगाव शहरातील सरदार मैदानाचा फक्त खेळांसाठीच वापर केला जावा. या मैदानावर सभा-समारंभ, प्रदर्शनं वगैरे आयोजित करण्यास परवानगी देऊ नये, अशी मागणी शहरातील क्रिकेटसह इतर क्रीडा प्रेमींनी केली आहे.

क्रिकेटसह इतर क्रीडा प्रेमींनी आज मंगळवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालय आवारात जमा होऊन कंग्राळ गल्लीतील केजीबी स्पोर्ट्स असोसिएशनच्या नेतृत्वाखाली उपरोक्त मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. बेळगाव शहरात सरदार मैदान हे एकमेव ओपन मैदान आहे. या मैदानावर बहुसंख्या खेळाडू क्रिकेट खेळतात. मात्र या मैदानावर समासमारंभाचे आयोजन करून मैदानाची दुर्दशा केली जात आहे. यासाठी या ठिकाणी सभा-समारंभ कोणताही कार्यक्रम, रॅली अथवा वस्तू प्रदर्शनांचे आयोजन करण्यास परवानगी दिली जाऊ नये.

क्रिकेटसह इतर खेळ खेळण्यासाठी त्याचप्रमाणे चालण्याचा व्यायाम करण्यासाठी या मैदानाचा वापर केला जातो. सभा-समारंभ अथवा प्रदर्शनाच्या आयोजनामुळे मैदानाचे नुकसान होण्याबरोबरच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अस्वच्छताही निर्माण होत असते. ज्याचा मैदानावर खेळण्यास येणाऱ्या खेळाडूंना आणि फिरावयास येणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. अलीकडे रात्रीच्या वेळी या मैदानाचा गैरप्रकारांसाठी वापर केला जात आहे.

याखेरीज परिसरातील रहिवासी आणि दुकानदारांकडून घाण व कचरा टाकण्यात येत असल्यामुळे मैदानावर कांही ठिकाणी दुर्गंधीचे वातावरण पसरलेले असते. तेंव्हा कृपया या सर्व गैरप्रकारांना आळा घालून सरदार मैदान हे फक्त खेळण्यासाठी आणि व्यायामासाठी राखीव ठेवावे, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे.

निवेदन सादर करतेवेळी ॲड. गंगाधर पाटील, इरफान बयाल, सुहास अडकुरकर, नामदेव कुंदरे, मैनू पठाण, मोसिन अजरेकर, परशुराम कोरे, शिरीष बाळेकुंद्री, रोहित निर्मळकर, सागर पाटील आदींसह खेळाडू आणि क्रीडाप्रेमी बहुसंख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.