विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसमध्ये इच्छुकांची रीघ लागली असून एकाच मतदार संघासाठी कालपर्यंत ७ जणांचे उमेदवारीसाठी केपीसीसीकडे अर्ज दाखल झाले आहेत. तर दक्षिण मतदार संघासाठी ३ इच्छुकांनी उमेदवारीची मागणी केली आहे.
या आखाड्यात माजी आमदार रमेश कुडची देखील उतरले असून दक्षिण मतदार संघासाठी त्यांनी केपीसीसीकडे उमेदवारीची मागणी केली आहे. गुरुवारी माजी जिल्हा पंचायत सदस्य रमेश गोरल आणि प्रभावती चौडीया यांनीदेखील उमेदवारीसाठी मागणी केली आहे.
काँग्रेसकडे उमेदवारीसाठी अर्ज केलेले सर्वच उमेदवार हे ‘एकापेक्षा एक सरस’ असे असल्याने काँग्रेस पक्षश्रेष्टींसमोर उमेदवारी जाहीर करण्याचे आव्हान उभे राहिले आहे. दररोज आश्चर्यकारक रित्या नवनव्या उमेदवारांचे अर्ज काँग्रेसकडे तिकिटासाठी दाखल होत असून इच्छुकांच्या या मांदियाळीत उमेदवारी कुणाच्या पदरात येणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
काल सेठ कुटुंबातील तिघांनी उत्तर मदारसंघासाठी उमेदवारीची मागणी केली आहे. माजी आमदार फिरोज सेठ, त्यांचे बंधू राजू सेठ आणि त्यांचे सुपुत्र फैजान सेठ या तिघांनीही उत्तर मतदार संघासाठी उमेदवारी मागितली आहे. तर नगरसेवक अझीम पटवेगार आणि काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते हाशिम भाविकट्टी या दोघांनीही मागणी केली आहे.
यांच्यासह सुधीर गड्डे आणि जिल्हा काँग्रेस अध्यक्ष विनय नावलगट्टी यांनीही उत्तर मतदार संघासाठी उमेदवारीची मागणी केली आहे. दक्षिण मतदार संघासाठी माजी जिल्हा पंचायत सदस्य रमेश गोरल आणि प्रभावती चौडीया यांच्यासह आज माजी आमदार रमेश कुडची यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केल्याने आता काँग्रेस निवडणुकीच्या आखाड्यात कोणत्या तगड्या उमेदवाराला उतरवेल याची उत्सुकता वाढली आहे.