रामदुर्गचे आमदार महादेवाप्पा यादवाड यांनी रामदुर्ग येथे आयोजित केलेल्या सिंचन कालव्याच्या भूमिपूजनादरम्यान शेतकऱ्यांना उद्देशून बोलताना वकिलांविरोधात वादग्रस्त वक्तव्य केले. याविरोधात आज बेळगाव बार असोसिएशनच्या वतीने आंदोलन छेडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.
आमदार महादेवाप्पा यादवाड यांनी रामदुर्ग येथे शेतकऱ्यांना संबोधित करताना, वकिलांच्या नादी लागून पैसे वाया घालवू नका असे वक्तव्य केले. या विधानामुळे समस्त वकिलांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर आम. महादेवाप्पा यादवाड यांच्या विरोधात आज बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.
आम. महादेवाप्पा यादवाड यांनी बेजबाबदारपणे सरकारी कार्यक्रमात केलेले वकिलांसंदर्भात केलेले विधान हे समस्त वकील वर्गाचा अवमान करणारे असून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी, आणि आमदारांनी वकिलांची माफी मागावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे, अशी माहिती बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ऍड. सुधीर चव्हाण यांनी दिली.
बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. प्रभू यत्नट्टी यांच्या नेतृत्वाखाली छेडण्यात आलेल्या आंदोलनात उपाध्यक्ष ऍड. सुधीर चव्हाण, ऍड. सचिन शिवण्णावर, सरचिटणीस ऍड. गिरीराज पाटील, सहसचिव ऍड. बंटी कपाही, ऍड. महांतेश पाटील, ऍड. अभिषेक उदोशी, ऍड. आदर्श पाटील, ऍड. इरफान ब्याल, ऍड. प्रभाकर पवार, ऍड. पूजा पाटील, ऍड. मारुती कामाण्णाचे आदी सहभागी झाले होते.