Monday, January 13, 2025

/

राज्योत्सवाच्या नावावर धुडगूस; दुकानांचे नुकसान

 belgaum

बेळगांव शहरात काल राज्योत्सव मिरवणुकीप्रसंगी भाडोत्री कार्यकर्त्यांनी धुडगूस घातल्यामुळे राणी कित्तूर चन्नम्मा चौक येथील चर्मकारांच्या शेड वजा दुकानांचे मोठे नुकसान झाले आहे. हुल्लडबाजी करणाऱ्या कानडी कार्यकर्त्यांनी या दुकानात समोरील खांबे व शेड यांचे जे मोठे नुकसान केले त्याला जबाबदार कोण? असा संतप्त सवाल येथील व्यावसायिकांनी उपस्थित केला आहे.

बेळगाव मध्ये काल राज्योत्सव दिनानिमित्त मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. या मिरवणुकीत सामील होण्यासाठी बेळगाव जिल्ह्याच्या विविध भागातील भाडोत्री युवक युवती कार्यकर्ते मोठ्या संख्येने शहरात दाखल झाले होते. मात्र या कानडी कार्यकर्त्यांनी राज्योत्सवाच्या नावावर अक्षरशः धिंगाणा घालत बेळगावकरांच्या सहनशक्तीचा अंत पाहिला. मिरवणुकीतील कार्यकर्त्यांच्या बेशिस्तपणाचा फटका राणी चन्नम्मा चौकातील चर्मकारांच्या शेड वजा दुकानांना बसला आहे.

कित्तूर राणी चन्नम्मा चौक हा शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या चार प्रमुख चौकांपैकी एक आहे. काल या चौकात मिरवणुकीत सहभागी झालेल्या कन्नड भाषिक कार्यकर्त्यांनी धुडगूस घालत हुल्लडबाजी केली. मुख्य मिरवणूक मार्ग सोडून आसपास असलेल्या शोरूमच्या परिसरात जाऊन त्यांनी तेथील शेड व खांबांचे नुकसान केले. सागर लाटे यांच्या दुकानाचे यात मोठे नुकसान झाले असून आता या नुकसानीची भरपाई कोण देणार? असा संतप्त सवाल त्यांनी केला आहे. राणी चन्नम्मा चौकात बहुतेक जण मद्यधुंद अवस्थेत नंगानाच करत रात्री उशिरापर्यंत धिंगाणा घालत होते. या कार्यकर्त्यांना आपल्या पायातील वहानांचे देखील भान नव्हते. त्यामुळे आज सकाळी चन्नम्मा चौक परिसरात मोठ्या प्रमाणात कचऱ्यासह चपला, बूट इतस्थता विखरून पडले होते. परिणामी महापालिकेचे स्वच्छता कर्मचारी धिंगाणा घालणाऱ्या कार्यकर्त्यांच्या नावे बोटे मोडत कचरा आणि चपला एकत्र करून चौकाची साफसफाई करताना दिसत होते.

दरम्यान राज्योत्सव मिरवणुकीतील कार्यकर्त्यांकडून आपल्या दुकानांच्या झालेल्या नुकसानी संदर्भात जिल्हा प्रशासन आणि आमदारांनी लक्ष पुरवून आपल्या उपजीविकेचे साधन असलेल्या व्यवसायाचे झालेले नुकसान भरून देण्याची मागणी संबंधित चर्मकार व दुकानदारांनी केली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.