बेळगाव केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांच्या वादग्रस्त विधानावरून बेळगावसह राज्यभरात राजकीय वातावरण तापले असून विरोधकांनी जारकीहोळींना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केल्यानंतर आता त्यांच्या समर्थनार्थ असंख्य जारकीहोळी समर्थक रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत.
आज बेळगावमध्ये सतीश जारकीहोळी समर्थकांनी भाजप आणि हिंदुत्ववादी संघटनांविरोधात आंदोलन छेडून रस्त्यावर उतरून शक्ती प्रदर्शन केले आहे. आमदार सतीश जारकीहोळी यांनी केलेल्या विधानाचा राजकीय स्वार्थापोटी विपर्यास केला जात असून त्यांच्या विरोधात आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून पद्धतशीर कट रचल्याचा आरोप आज जारकीहोळी समर्थकांनी केला. भाजप नेत्यांचे फोटो हातात घेऊन भाजप आणि हिंदू संघटनांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत मोठ्या संख्येने विशाल निषेध मोर्चा काढून संताप व्यक्त करण्यात आला.
सीपीएड मैदानापासून सुरु झालेल्या निषेध मोर्चात मोठ्या संख्येने सामील झालेल्या जारकीहोळी समर्थकांनी भाजप आणि हिंदू संघटनांना इशारा दिला आहे. माजी आमदार संजय पाटील यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन देखील करण्यात आले.
या निषेध मोर्चात सहभागी झालेल्या आंदोलकांनी भगवे, निळे वस्त्र आणि शाल परिधान करून सहभाग घेतला होता, हे विशेष. राणी कित्तूर चन्नम्मा सर्कल मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निघालेल्या निषेध मोर्चात आमदार सतीश जारकीहोळी यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरून केलेल्या आंदोलनात एकप्रकारचे शक्तिप्रदर्शनच करण्यात आल्याचे चित्र दिसून आले.
पंचमसाली लिंगायत समाज आरक्षणाला आपला पाठिंबा आहे, मात्र पंचमसाली लिंगायत समाजाच्या गोकाक येथे होणाऱ्या मेळाव्याच्या व्यासपीठावर आमदार सतीश जारकीहोळी यांच्याविरोधात भाषणबाजी करण्यात आली तर त्याचे परिणाम वाईट होतील, असा इशाराही मोर्चात सहभागी झालेल्या आंदोलकांनी दिला. यावेळी आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांनाही खुले आव्हान देण्यात आले आहे.