पेन्शन वाढीसह आपल्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी शहर व जिल्ह्यातील दिव्यांगांनी आज बुधवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले आणि जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले.
दिव्यांगानी सादर केलेल्या निवेदनाचा स्वीकार करून जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्यकांनी ते त्वरित मुख्यमंत्र्यांकडे धाडण्याचे आश्वासन दिले.
निवेदन सादर केल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना दिव्यांग उमेश रोट्टी यांनी 75 ते 100 टक्क्यापर्यंत शारीरिक अपंगत्व असलेल्या लोकांसाठी शासनाकडून सध्या 1400 रुपये पेन्शन दिली जात आहे.
तथापि सध्या दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या असल्यामुळे या पेन्शनचा काहीच उपयोग नाही. या अत्यल्प पेन्शनमुळे आमचे जगणे खूप कठीण बनले आहे.
त्यामुळे सरकारने सध्या सध्या दिल्या जात असलेल्या पेन्शनमध्ये वाढ करून ती 3000 ते 5000 रुपये इतकी करावी. तसेच विवाहित दिव्यांगांच्या मुलांना शासनाने मोफत शिक्षणासह शासकीय अनुदान द्यावे, अशा आपल्या मागण्या असल्याचे सांगितले.