अलीकडे पडलेल्या परतीच्या पावसामुळे आणि रोगाच्या प्रादुर्भावामुळे कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील 96 हेक्टर जमिनीतील म्हणजे 240 एकरातील कांदा कुजण्याबरोबरच सध्या दरही कमी झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
गेल्या ऑक्टोबर महिन्यात पडलेल्या पावसामुळे काढणीस आलेला कांदा शेतात कुजला आहे. कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्र राज्याचे केंद्रस्थान असलेल्या बेळगाव एपीएमसी बाजारपेठेत बेळगाव, बागलकोट, विजापूर आणि महाराष्ट्रातील विविध भागातून कांदा दाखल होतो.
तथापि यंदा राज्यातच मोठ्या प्रमाणात कांद्याचे नुकसान झाले आहे. राज्यभरात 31 हजार 330 हेक्टर जमिनीतील कांद्याची हानी झाली आहे. सध्या कांद्याचा दर देखील घसरला आहे.
खरीप हंगामात कांद्याची पेरणी केली असता पडलेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी कांदा पीक पाण्याखाली गेले होते. त्यातच पावसामुळे कांही ठिकाणी कांद्यावर किडीचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे 40 टक्के कांद्याचे नुकसान झाले असून जो कांदा बाजारपेठेत येत आहे त्याची जास्त दिवस साठवणूक करता येत नसल्याने समस्या निर्माण झाली आहे.
सध्या 90 टक्के स्थानिक कांद्याला योग्य दर्जा नसल्याने दर कमी झाला आहे. सर्वसाधारणपणे प्रति एकरी किमान 300 पोती कांदा उत्पादित होतो, परंतु यावेळी पावसामुळे केवळ 150 पोती कांदा उपलब्ध होत आहे.