बारावी परीक्षेच्या उत्तर पत्रिका मूल्यमापनात गंभीर चूक केल्याचे निदर्शनास आल्याने 9 प्राध्यापकांना सेवेतून निलंबित करण्यात आले असून या कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
गेल्या एप्रिल व मे 2022 मध्ये झालेल्या बारावी परीक्षेच्या उत्तरपत्रिकांच्या मूल्यमापनावेळी संबंधित प्राध्यापकांकडून गंभीर चुका झाल्या आहेत. कांही उत्तर पत्रिकांची पाने तपासलीच नसल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. उत्तर पत्रिकांची पाने न तपासल्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
निलंबित केलेले प्राध्यापक शासकीय पदवीपूर्व महाविद्यालयात सेवा बजावतात. त्यांच्या व्यतिरिक्त खाजगी विनाअनुदानित पदवी पूर्व महाविद्यालयातील एका प्राध्यापकावरही कारवाई झाली आहे. तथापि त्याच्यावर फक्त शिस्तभंगाची कारवाई करण्याचे निर्देश पदवी पूर्व शिक्षण विभागाने दिले आहेत. या पद्धतीने कारवाई झालेल्या दहा प्राध्यापकांपैकी पाच जण भौतिकशास्त्र तर उर्वरित पाच जण इंग्रजी विषयी संबंधित आहेत.
दरम्यान, राज्य पदवीपूर्व महाविद्यालय शिक्षक संघटनेने या कारवाईला विरोध केल्याने वाद भेटण्याची शक्यता आहे. संघटनेचे अध्यक्ष निंगेगौडा यांच्या मते मूल्यमापना चूक झाल्यास निलंबन करता येत नाही.
एखाद्या मूल्यमापकाकडून 3 गुण कमी दिले गेले तर 100 रुपये दंड आकारला जातो. फेर मूल्यांकनात 10 गुणांचा फरक आढळला तर मानधन दिले जात नाही. तसेच पुढील 5 वर्षासाठी त्याचा समावेश काळ्या यादीत केला जातो. पदवी पूर्व शिक्षण विभागाने ज्या नियमांतर्गत संबंधित प्राध्यापकांवर कारवाई केली आहे, तो नियम या प्रकरणात लागू होत नसल्यामुळे निलंबन मागे घेतले जावे असे मत निंगेगौडा यांनी व्यक्त केले आहे.