कर्नाटक सरकारने आखलेला रिंगरोडचा प्रस्ताव रद्द करावा तसेच सरकारचा हा घाट उधळून लावण्यासाठी समितीने २८ नोव्हेंबर रोजी विराट चाबूक मोर्चा आयोजित केला असून या मोर्चाच्या जनजागृतीसाठी तालुक्यात विविध ठिकाणी बैठकीचे आयोजन करण्यात येत आहे. नुकत्याच झाडशहापूर आणि वाघवडे येथे झालेल्या जनजागृती बैठकीत २८ रोजी होणारा चाबूक मोर्चा यशस्वी करण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
रिंग रोड आणि विविध प्रकल्पात ज्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनी बळकावण्याचा घाट घालण्यात आला आहे अशा सुमारे ७०० हुन अधिक कुटुंबातील महिला चाबूकसहित या मोर्चात सहभागी होणार आहेत. मोर्चामध्ये चाबूक सहित सहभागी होण्यासाठी, चाबूक बनविण्याची ऑर्डर देखील देण्यात आली असून या सर्व गावातील सर्व महिला आपल्या कुटुंबियांसमवेत हजारोंच्या संख्येने रस्त्यावर उतरून आपला विरोध व्यक्त करणार आहेत.
रिंग रोड सह विविध प्रकल्पांमुळे केवळ शेतजमिनीचा उद्ध्वस्त होणार नाहीत तर या गावातील सर्व शेतकरी, त्यांचे कुटुंब देशोधडीला लागणार आहे. इतकेच नाही तर झाडशहापूर गाव हे संपूर्णपणे उद्धवस्त होणार आहे. सरकारचा हा कुटील डाव हाणून पाडण्यासाठी सदर चाबूक मोर्चा हजारोंच्या सहभागाने पार पडणार आहे.
माजी आमदार मनोहर किणेकर, मध्यवर्तीचे प्रकाश मरगाळे विकास कलघटगी,समिती नेते आर. एम. चौगुले, माजी महापौर शिवाजी सुंठकर, ऍड. शाम पाटील, ऍड. सुधीर चव्हाण, वकील एम. जी. पाटील, वकील प्रसाद सडेकर आंबेवाडी ग्रामपंचायत अध्यक्ष चेतन पाटील, तसेच एपीएमसी सदस्य आर. के. पाटील यांच्यासह महाराष्ट्र एकीकरण समिती नेते, शेतकरी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत चाबूक मोर्चाविषयी चर्चा करण्यात आली.
राष्ट्रीय महामार्ग व रस्ते प्राधिकरण मंडळाने बेळगाव तालुक्यात, बेळगाव शहराभोवती १० ते १२ किलोमीटर अंतरावर रिंगरोड तयार करण्याचा घाट घातला आहे. यामध्ये बेळगाव तालुक्यातील ३२ गावातील १३०० एकर शेतकऱ्यांच्या पिकाऊ जमिनी जाऊन शेतकरी देशोधडीला लागणार आहेत. रिंगरोडमुळे १० ते १२ किलोमीटर मधील संपूर्ण रस्ता बेळगाव स्मार्ट सिटीच्या नवे नव्या वसाहती, बुडा ले आउट, औद्योगिक वसाहत, कर्नाटक हाऊसिंग बोर्ड या नावाखाली योजना आखून गिळंकृत करण्याचा डाव कर्नाटक सरकारने आखला आहे. बेळगाव तालुक्यातील झाडशहापूर, आंबेवाडी, कोंडुसकोप्प येथील हजारो एकर जमीन समितीने वाचविली आहे. कर्नाटक सरकारने घातलेला रिंग रोडचा घाट उधळून लावण्यासाठी समितीने गेल्या दोन महिन्यांपासून जनजागृती करण्यासाठी बैठका घेतल्या आहेत.
अगसगा, आंबेवाडी, बाची, बहाद्दरवाडी, बेळगुंदी, कडोली, काकती, बीजगर्णी, गोजगे, होनगा, शगनमट्टी, शिंदोळी, कलखांब कल्लेहोळ , कमकारहट्टी, कणबर्गी, कोंडुसकोप्प, मण्णूर, मास्तमर्डी, मुचंडी, मुतगा, नावगे, संतीबस्तवाड, सोनट्टी, सुळगे, येळ्ळूर, धामणे, तुरमुरी, उचगाव, वाघवडे, यरमाळा, येळ्ळूर, झाडशहापूर येथील शेतीबरोबरच शेतकरी आणि संपूर्ण गाव उद्ध्वस्त होणार आहे. ज्या ३२ गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी हडपण्याचा डाव आखण्यात आला आहे, तेथील शेतकऱ्यांच्या हरकती नोंदविण्यात आल्या आहेत.
कायदेशीर लढाईबोरोबर रस्त्यावरील लढाईला सरकार नमेल हे लक्षात घेऊन सोमवार दि. २८ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता विराट मोर्चार्चे आयोजन करण्यात आले आहे. धमर्वीर संभाजी चौकातून या महामोर्चाला सुरुवात होणार आहे.
यामध्ये बेळगाव तालुक्यातील सर्व शेतकरी कुटुंबातील महिलांनी, विद्यार्थ्यांनी, युवक-युवतींनी आणि कार्यकर्त्यांनी तसेच आजी माजी लोकप्रतिनिधींनी, बैलगाडी, ट्रॅक्टर, जनावरे घेऊन आपापल्या गावच्या बॅनरसहित मोठ्या संख्येने हजर राहून मोर्चा यशस्वी करावा, असे आवाहन बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने केले आहे.