बदलत्या काळाशी जुळवून घेण्यासाठी मराठा समाज सुधारणा मंडळांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत बसवाण गल्ली शहापूर येथील धामणेकर कुटुंबीयांनी सात ऐवजी 5 दिवसांचा दुखवटा पाळण्याचा निर्णय घेतला आहे.
बसवाण गल्ली शहापूर येथील सुधा लक्ष्मण धामणेकर यांचे गेल्या 30 ऑक्टोबर रोजी निधन झाले. त्यावेळी उपस्थित माजी नगरसेवक नेताजी जाधव यांच्यासह व मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी धामणेकर कुटुंबीयांना मराठा समाज सुधारणा मंडळाने घेतलेल्या निर्णयाची माहिती देऊन आवाहनाला प्रतिसाद देण्याची विनंती केली.
त्या विनंतीला मान देऊन धामणेकर कुटुंबीयांनी 5 दिवसांचा दुखवटा पाळण्याचा निर्णय घेतला असून या निर्णयाचे स्वागत होत आहे.
मराठा समाज सुधारणा मंडळांनी घेतलेले निर्णय आणि केलेल्या आवाहनासंदर्भात बेळगाव लाईव्हला माहिती देताना मंडळाचे कार्याध्यक्ष शिवराज पाटील म्हणाले की, बदलत्या काळाशी जुळवून घेऊन पुढे चालण्यासाठी अलीकडेच झालेल्या मराठा समाज सुधारणा मंडळाच्या सर्वसाधारण सभेत ठरावाद्वारे दोन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मराठा समाजातील एखाद्याच्या निधनानंतर 11 ऐवजी 7 दिवसांचा दुःखवटा पाळण्यात यावा.
सौभाग्य गमावलेल्या विधवा महिलांचे बांगड्या फोडणे, मंगळसूत्र उतरवणे वगैरे विधी स्मशानात न करता घरीच केले जावेत, हे ते दोन निर्णय होते. मध्यंतरी नवी गल्ली येथील आमचे कार्यकर्ते प्रकाश हंडे यांचे निधन झाले. त्यावेळी हंडे कुटुंबीयांनी सर्वप्रथम मंडळाच्या निर्णयाची अंमलबजावणी केली. त्यावेळी प्रकाश यांच्या विधवा पत्नीचे विधी घरीच करण्यात आले. त्यानंतर आता धामणेकर कुटुंबीयांनी अकरा किंवा सात नव्हे तर 5 दिवसांचा दुखवटा पाळण्याचा निर्णय घेतला आहे.
या पद्धतीने मराठा समाजाने स्वता:त बदल करून काळासोबत चालण्यास सुरुवात केली आहे. आता लवकरच आम्ही जुने बेळगाव, अनगोळ शहापूर वडगाव आदी भागात जाऊन पुन्हा जनजागृती करणार आहोत. याव्यतिरिक्त मयताच्या घरी शेजाऱ्यांसह भेटण्यास जाणारी मंडळी सुतक असल्यामुळे जेवण, नाश्ता वगैरे खाद्यपदार्थ घेऊन जातात. मात्र यामुळे अन्नाची निष्कारण नासाडी होत असते, हे ध्यानात घेऊन संबंधित कुटुंबासाठी सर्वांनीच अन्न घेऊन न जाता तांदूळ, डाळ वगैरे शिधा घेऊन जावा, असे आवाहन आम्ही केले होते. त्याला देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे.
तसेच तिसऱ्या दिवशी रक्षा विसर्जना वेळी स्मशानात अनेक जण प्रसाद ठेवतात. तसे न करता फक्त मयताच्या कुटुंबीयांनीच प्रसाद ठेवावा या आम्ही केलेल्या आवाहनाला देखील हळूहळू प्रतिसाद मिळत आहे, अशी माहिती कार्याध्यक्ष शिवराज पाटील यांनी दिली.