कोरोना परिस्थितीमुळे उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीत मराठा समाजातील अनेक लोकांना रक्तपेढी उपलब्ध होऊ शकली नाही. या गोष्टीचा सारासार विचार करून सकल मराठा समाज संघटक आणि राज्य भाजपा ओबीसी महामोर्चाचे सचिव किरण जाधव यांच्या नेतृत्वाखाली , सकल मराठा समाज वैद्यकीय विभाग यांच्या संकल्पनेतून “मराठा ब्लड बँक” सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
विमल फाउंडेशनच्या कार्यालयात सर्व मराठा समाजाच्या नेत्यांच्या उपस्थितीत मंगळवारी झालेल्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. मराठा समाजातील लोकांचे आरोग्य चांगले राहावे या दृष्टिकोनातून रक्तपेढीमध्ये योग्य वेळी मुबलक रक्त उपलब्ध नसल्याने आपत्कालीन परिस्थितीत समाजातील लोकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले आहे.
भविष्यात अशा अडचणींवर मात करण्यासाठी, याकडे बारकाईने लक्ष देऊन आपल्या समाजातील लोकांना वेळेवर रक्त उपलब्ध होईल याची काळजी घ्यावी या विषयांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. तसेच वेगवेगळ्या भागातील नामांकित डॉक्टरांचा सल्ला घेण्यात आला.
लवकरच मराठा समाजासाठी रक्तपेढी सुरू होणार असून त्याचा सर्व मराठा समाज बांधवांनी सदुपयोग करून घ्यावा, असे आवाहन यावेळी किरण जाधव यांनी केले.
या बैठकीला डॉ. समीर कुट्रे, डॉ. मिलिंद हलगेकर, डॉ. रायकर, डॉ. पोटे आदी उपस्थित होते.