भारताचा दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर अलीकडेच मजगाव बेळगाव येथील गोवा मार्गावरील रस्त्याशेजारी असणाऱ्या फौजी टी स्टॉल या कॅन्टीनमध्ये चहा पिऊन गेल्यापासून या कॅन्टीनचा व्यवसाय डबल झाला असून कॅन्टीन चालकाचे जणू भाग्यच उजळले आहे.
देशातील क्रिकेट प्रेमींच्या गळ्यातील ताईत असणारा दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आठवडाभरापूर्वी आपल्या कुटुंबीयांसमवेत कोल्हापूर येथील नरसिंहवाडी येथे जाऊन बेळगाव मार्गे गोव्याला निघाला होता. त्यावेळी सकाळी 8 च्या सुमारास उद्यमबाग मजगाव येथील गोवा मार्गा शेजारी असलेल्या एका कॅन्टीनमध्ये अल्पकाळ थांबून त्याने तेथील चहा आणि टोस्टचा आस्वाद घेतला.
सचिनला चहा इतका आवडला की त्याने तो दोनदा घेतला. त्यानंतर आपल्या कुटुंबीयांसमवेत सचिन गोव्याला रवाना झाला. त्यानंतर सचिन तेंडुलकरने भेट दिलेले ते कॅन्टीन सर्वांचेच आकर्षण ठरले आहे.
सदर कॅन्टीन चालकाला सचिनने चहाचे 175 रुपये बिल देऊ केले मात्र तुमच्यासारख्या महान व्यक्तीकडून मी पैसे कसे काय घेईन असे सांगून कॅन्टीन चालकाने पैसे घेण्यास नकार दिला. तथापि तू आमच्यासाठी चहा बनवलास की तुझे कष्टाचे पैसे आहेत असे सांगून सचिनने 200 रुपयाची नोट काढून दिली. सचिन तेंडुलकर माझ्या कॅन्टीन मध्ये चहा पिऊन गेले ही माझ्यासाठी अत्यंत भाग्याची गोष्ट आहे असे तो कॅन्टीन चालक अभिमानाने सांगतो.
सचिनने चहाच्या बिलापोटी मोठ्या प्रेमाने दिलेली त्याचा ऑटोग्राफ असलेली ती 200 रुपयाची नोट त्या कॅन्टीन चालकाने जपून ठेवली आहे. सचिन माझ्या कॅन्टीनमध्ये चहा पिऊन गेल्यापासून त्याचे चाहते मोठ्या संख्येने माझ्या कॅन्टीनला भेट देत आहेत. त्यामुळे माझा दररोजचा व्यापारही दुप्पट झाला आहे असेही फौजी टी स्टॉल कॅन्टीन मालकाने सांगितले.