मुचंडी (ता. बेळगाव) येथील ख्यातनाम कुस्तीपटू पै. अतुल सुरेश शिरोले यांची गीर जातीची दुभती गाय आज मंगळवारी सकाळी लंपी स्कीन रोगामुळे मरण पावली. यामुळे शिरोले यांचे सुमारे 1 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
मसनाईनगर, मुचंडी येथील आंतरराष्ट्रीय मल्ल पै. अतुल शिरोले यांचे शेतकरी वडील सुरेश शिरोले यांनी खास करून आपल्या पैलवान मुलाच्या खुराकासाठी दोन वर्षांपूर्वी गुजरात येथून 1.30 लाख रुपयांत दोन गीर गाई खरेदी करून आणल्या होत्या.
त्यामुळे दोन वर्षात त्या शिरोले कुटुंबाच्या जणू सदस्य बनल्या होत्या. त्यापैकी एक गाय लंपी स्किनची लागण झाल्यामुळे गेल्या आठ दिवसापासून आजारी होती. पशुवैद्यांच्या मार्गदर्शनाखाली तिच्यावर नियमित उपचारही केले जात होते.
मात्र दुर्दैवाने उपचाराचा फायदा न होता आज सकाळी त्या गायीचा मृत्यू झाला. मृत गाईवर शिरोले यांनी घराजवळील स्वतःच्या शेतात अंत्यसंस्कार केले.
सदर गीर गाय दिवसाकाठी जवळपास 12 लिटर दूध देत होती. गाय दगावल्यामुळे शिरोले यांचे सुमारे 1 लाख रुपयांचे नुकसान झाले असून शिरोले कुटुंबीयांवर दुःखाची छाया पसरली आहे. सदर गाईच्या मृत्यूबद्दल मसनाई नगरात हळहळ व्यक्त होत आहे.