आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून सीमाभागातील लाखो मराठी भाषिकांची ताकद दाखवून देण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती, तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती आणि सर्व घटक समित्यांमध्ये एकी करण्याचा निर्धार करण्यात आला असून या अंतर्गत आज खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीमध्ये झालेल्या बैठकीत एकमताने एकीवर शिक्कामोर्तब झाले.
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून खानापूर महाराष्ट्र एकीकरण समितीत एकीची बैठक यशस्वी झाली असून खानापुरात मराठी माणूस एकत्रित आला आहे. बुधवारी दुपारी एकीकडे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची संकल्प यात्रा सुरू व्हायच्या आधीच खानापूर मधील मराठी भाषिकांना गोड बातमी मिळाली आहे.
खानापूर शिवस्मारक येथे सकाळी ११ वाजल्या पासून दोन्ही गटातील सदस्यांची मॅरेथॉन बैठक झाली. मध्यवर्ती समितीचे नेते राजाभाऊ पाटील, प्रकाश मरगाळे,रणजित चव्हाण पाटील,एम जी पाटील आणि विकास कलघटगी यांच्या प्रयत्नातून सदर बैठक यशस्वी ठरली आहे.
या बैठकीत खानापूर समितीच्या दोन्ही गटाच्या जवळपास 42 हून अधिक जणांनी विचार मांडले. सर्व विचाराअंती बैठक यशस्वी होऊन एकमत झाले आहे. बैठकीत ठरल्या प्रमाणे दोन्ही गटातील ८ सदस्यीय समिती खानापूर तालुक्याचा दौरा करणार असून, प्रत्येक गावातून दोन सदस्यांना घेण्यात येणार आहे. नवीन समितीत नव्या सामावून घेण्यासाठी दौरा करून नवीन नाव नोंदणी केली जाणार आहे.
१५ दिवसांनंतर मध्यवर्ती समिती, खानापूर तालुक्याची नवीन कार्यकारिणीची घोषणा करणार आहे.आठ सदस्यीय समितीत गोपाळराव देसाई, राजू पाटील, धनंजय पाटील, किशोर हेब्बाळकर, यशवंत बिर्जे, प्रकाश चव्हाण ,रमेश धबाले, हणमंत मेलगे यांचा समावेश करण्यात आला आहे तर दोन्ही गटातील चार चार सदस्य आता खानापूर तालुक्याचा कार्यभार सांभाळणार आहेत.
महाराष्ट्र एकीकरण समितीमध्ये असलेल्या गटा-तटाच्या राजकारणामुळे गेल्या दोन निवडणुकांमध्ये मराठी माणूस पिछाडीवर आला होता. मात्र आगामी निवडणुकीत मराठी भाषिकांची एकजूट करून, पुन्हा सीमाभागात मराठी भाषिकांची सत्ता आणून, आपले प्रश्न मार्गी लावण्याचा निर्धार करण्यात आला आहे. आज खानापूर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत झालेला एकीचा निर्णय हा आगामी निवडणुकीसाठी नक्कीच लाभदायक ठरेल, असे संकेत दिसत आहेत.
बेळगाव सह सीमा भागातील मराठी माणसासाठी दोन गोड बातम्या आल्या आहेत एक म्हणजे नेहमी सीमावासीयांच्या पाठीशी असलेले शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना ईडीच्या कोर्टाने जामीन मंजूर केला आणि दुसरी खानापूर समितीची झाली या दोन बातम्यांमुळे बेळगाव येथील मराठी माणसाला नक्कीच आनंद झाला असेल.