वझे गल्ली, वडगाव येथील शतायुषी आजी कमळाबाई विठ्ठल बैलूर यांचा 100 वा वाढदिवस बैलूर कुटुंबीयांच्यावतीने सत्कारासह तुलाभार करण्याद्वारे उत्साहात साजरा करण्यात आला.
वडगाव येथील अनुसया मंगल कार्यालयामध्ये नुकतेच या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बडकोळ मठाचे नागेंद्र स्वामीजी यांच्यासह माजी महापौर मालोजीराव अष्टेकर किरण सायनाक श्रीराम सेना हिंदुस्तानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर, सामाजिक कार्यकर्ते विकास कलघटगी माजी नगरसेवक नेताजी जाधव, पंढरी परब, रतन मासेकर, नागाप्पा सातेरी, अनिल पाटील तुकाराम बँकेचे चेअरमन प्रकाश मरगाळे, माजी नगरसेवक नागाप्पा सातेरी,राजेंद्र मुतगेकर,महेश जुवेकर,सुरेश मलीक,अमोल देसाई, संजय सव्वाशेरी,आर एम चौगुले,मदन बामणे मनोहर हलगेकर,आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी माजी महापौर आप्पासाहेब पुजारी यांनी सर्वांचे स्वागत करण्याबरोबरच प्रास्ताविकात शतायुषी माऊली कमळाबाई बैलूर यांची माहिती दिली. काकती येथील गवी कुटुंबात लक्ष्मण व विठाबाई यांच्या पोटी जन्मलेल्या कमळाबाई लग्नानंतर वझे गल्लीच्या रहिवासी झाल्याचे सांगून त्यांच्या स्वभाव वैशिष्ट्यांची माहिती दिली. तसेच त्यांना आणखी उदंड आयुष्य लाभू दे अशा शुभेच्छा दिल्या. त्यानंतर नागेंद्र स्वामीजींच्या हस्ते कमळाबाई यांचा 100 व्या वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला.
यावेळी मालोजीराव अष्टेकर, रमाकांत कोंडुसकर, नेताजी जाधव आदींची समयोचीत शुभेच्छापर भाषणे झाली. यावेळी बैलूर कुटुंबीयांकडून कमळाबाई यांची 100 दिव्यांनी ओवाळणी करण्यात आली. त्याचप्रमाणे गुळ, तांदूळ, गहू वगैरे अन्नधान्याच्या सहाय्याने त्यांचा तुलाभार करण्यात आला.
या तुलाभाराद्वारे जमलेला अन्नधान्यांचा शिधा अनाथ आश्रमाला दान करण्यात आला. शतायुषी कमळाबाई यांचा परिवार इतका मोठा आहे की त्यांना तीन कर्ते चिरंजीव आणि चार विवाहित कन्यांसह 19 नातवंडे आणि 23 पणतवंडे आहेत. नातवंडांपैकी जवळपास सर्वजण इंजिनियर, वकील असे उच्चशिक्षित आहेत.
उपरोक्त वाढदिवस कार्यक्रमास बैलूर कुटुंबीयांचे आप्तस्वकीयांसह वझे गल्ली आणि विष्णू गल्ली वडगाव परिसरातील रहिवाशी आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. समारंभाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन माजी महापौर आप्पासाहेब पुजारी यांनी केले.