डीवायईएस स्पोर्ट्स हॉस्टेल बेळगावच्या ज्युडो खेळाडूंनी आनंदपुरा (जि. शिमोगा) येथे नुकत्याच पार पडलेल्या 13 व्या सह्याद्री उपकनिष्ठ, कॅडेट आणि 39 व्या कर्नाटक कनिष्ठ व वरिष्ठ ज्युडो चॅम्पियनशिप स्पर्धेत 28 सुवर्णपदकांसह तब्बल एकूण 59 पदकांची लयलूट करत स्पर्धेचे सर्वंकष अजिंक्यपद हस्तगत केले आहे.
आनंदपुरा (जि. शिमोगा) येथे गेल्या 19 ते 21 नोव्हेंबर या कालावधीत 13 व्या सह्याद्री उपकनिष्ठ, कॅडेट आणि 39 व्या कर्नाटक कनिष्ठ व वरिष्ठ ज्युडो चॅम्पियनशिप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
सदर राज्यस्तरीय स्पर्धेत बेळगाव डीवायईएस स्पोर्ट्स हॉस्टेलच्या ज्युडो खेळाडूंनी सर्वांकष अजिंक्यपदाची आकर्षक ट्रॉफी हस्तगत करण्याबरोबरच 28 सुवर्णपदक, 15 रौप्य पदक आणि 16 कांस्य पदक पटकावली आहेत.
प्रमुख पाहुणे डॉ श्री श्री मल्लिकार्जुन मुरुघराजेंद्र महास्वामीजी आणि कर्नाटक ज्युडो संघटनेचे पदाधिकारी यांच्या हस्ते बेळगावच्या जुडो खेळाडूंनी अजिंक्यपदाची ट्रॉफी स्वीकारली. याप्रसंगी जुडो प्रशिक्षक रोहिणी पाटील, देवीश्री, विक्रमसिंग कदम -पाटील आदी उपस्थित होते.
या राज्यस्तरीय ज्युडो सुवर्णपदक मिळविणारे बेळगावचे ज्युडो खेळाडू पुढील महिन्यात झारखंड आणि तामिळनाडू येथे होणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरील ज्युडो चॅम्पियनशिप स्पर्धेत कर्नाटक राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
राज्यस्तरीय स्पर्धेतील डीवायईएस स्पोर्ट्स हॉस्टेल बेळगावच्या यशस्वी ज्युडो खेळाडूंना डीवायईएस खात्याचे उपसंचालक जयनेश्वर पदनंद यांचे प्रोत्साहन आणि जुडो प्रशिक्षक रोहिणी पाटील व कुतुजा मुलतानी यांचे मार्गदर्शन लाभत आहे.