Monday, January 13, 2025

/

कर्नाटक गुंतवणूक मेळाव्यात बेळगावचा ‘हा’ प्रोफाइल

 belgaum

कर्नाटकातील चौथे सर्वात मोठे शहर असणारे बेळगाव हे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे निर्यातदार असून ज्याचा जीडीपी अर्थात सकल देशांतर्गत उत्पादन 159.65  अब्ज रुपये इतके आहे. या जिल्ह्याच्या 48 टक्के जमिनीचा वापर शेत लागवडीसाठी केला जातो. ज्यामध्ये प्रामुख्याने कडधान्य आणि तृणधान्यांची पिके घेतली जातात.

बेळगाव हे फळांसह कांदा, बटाटा, टोमॅटो वगैरे भाजीपाल्याच्या लागवडीसाठीही सुपरिचित आहे. हा जिल्हा भारताच्या पहिल्या सूचित एरोस्पेस प्रिसिशन इंजिनिअरिंग आणि सेझ सेंटर निर्मितीचे घर आहे. कृषी क्षेत्र आणि संलग्न उद्योगांच्या वाढीसाठी स्टोरेज कोल्ड स्टोरेज उपलब्ध असणारे केंद्र म्हणून बेळगाव उदयास येत आहे. कृषी पूरक वातावरण आणि सुपीक जमीन यामुळे कृषी क्षेत्र आणि त्याच्याशी संलग्न उद्योगात बेळगाव सक्षम बनले आहे.

या जिल्ह्यातील 48 टक्के जमीन व्यावसायिक पिकांच्या पेरणीसाठी वापरली जाते. तसेच जिल्ह्यातील 26 टक्के जमिनीपैकी 12 टक्के जमीन बिन पिकाऊ पडीक असून उर्वरित 14 टक्के जमीन जंगलाने व्यापली आहे. लँड बँक एरिया 225 एकर इतका आहे. बेळगाव जिल्ह्यातून कृष्णा मलप्रभा आणि घटप्रभा या तीन प्रमुख नद्या वाहतात. ज्या जिल्ह्याच्या जलसिंचनात मदत करतात. बेळगाव हा राज्यातील सरासरीपेक्षा जास्त म्हणजे 58 टक्क्याहून अधिक जमीन जलसिंचनाखाली आणणारा जिल्हा आहे.

हुबळी इलेक्ट्रिसिटी सप्लाय कंपनी लिमिटेड अर्थात हेस्काॅमकडून बेळगाव जिल्ह्याला वीजपुरवठा केला जातो. जिल्ह्यात दरवर्षी सरासरी 526.618 एमयू वीज औद्योगिक क्षेत्रासाठी वापरली जाते तर 406.376 एमयू विजेचा घरगुती वापर केला जातो. सध्या या जिल्ह्यात सोलार (सौर) फोटोव्होल्टेइक प्रकल्प तसेच गॅस संबंधी प्रकल्प सुरू आहेत. बेळगाव जिल्ह्यात खनिजांच्या स्त्रोतांचा खजिना आहे. चुनखडीच्या प्रचंड साठ्यासह बॉक्साईट, युरेनियम, सिलिका सॅन्ड, ॲल्युमिनियम, लेटराईट, डोलोमाइट, कॉर्टझाईट आणि चायना क्ले यांनी हा जिल्हा समृद्ध आहे. ज्यामुळे येथील ॲल्युमिनियम उद्योगाला इंधन मिळते.

बेळगाव जिल्ह्यात उच्च शिक्षणाच्या अनेक शैक्षणिक संस्था असून ज्यामध्ये विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाचा समावेश आहे. हे विद्यापीठ येथील औद्योगिक क्षेत्राला कुशल मनुष्य संसाधन पुरवते. बेळगावचे स्वतःचे देशांतर्गत विमानतळ असून या जिल्ह्यानजीकच अन्य दोन देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानतळं आहेत. तीन राष्ट्रीय महामार्गांना जोडण्याद्वारे सोनेरी चतुर्भुज (गोल्डन कॉड्रीलॅटरल) निर्माण करणारा हा जिल्हा पुणे -बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाचा एक भाग आहे. या खेरीज बेळगाव जिल्हा गोव्यासह एकूण तीन बंदरांना जोडला गेला आहे.

बेळगावचे तापमान 12 डिग्री सेल्सिअस आणि 38 डिग्री सेल्सिअस दरम्यान बदलत असते. या जिल्ह्यात सर्व त्या मूलभूत गरजा उपलब्ध आहेत. बेळगाव जिल्ह्यात 10 प्रमुख हॉस्पिटल्स असून 344 खाजगी नर्सिंग होम आहेत. याखेरीज 139 प्राथमिक आरोग्य केंद्र आणि 14 कम्युनिटी हेल्थ सेंटर्स देखील आहेत. चार विद्यापीठे असणाऱ्या या जिल्ह्यात 180 सर्वसामान्य पदवी महाविद्यालयं, दोन वैद्यकीय महाविद्यालयं 18 पॉलिटेक्निक महाविद्यालयं आणि 11 अभियांत्रिकी महाविद्यालयं आहेत. या ठिकाणी हिंडाल्को, हिंदुस्थान लेटेक्स लि., एकेपी फाउंड्रीज, दालमिया सिमेंट, पॉलिहायड्रोन प्रा. लि., फोर्स कॅम्पबेल नीटवेर, गोकाक टेक्स्टाईल्स लि., श्री रेणुका शुगर लि. आदी मोठे उद्योग आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.