बेळगावमधील राणी चन्नम्मा विद्यापीठांतर्गत येणाऱ्या पदव्युत्तर महाविद्यालयांची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. यंदा विद्यापीठाने पदव्युत्तर विभागाच्या प्रवेश शुल्कात दुप्पट-तिप्पट वाढ केली आहे. यामुळे विद्यार्थ्यातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.तसेच उच्च शिक्षण विभागाने याविषयी लक्ष पुरवून शुल्क कमी करावेत, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे.
भुतरामहट्टी येथे असणाऱ्या राणी चन्नम्मा विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना यापूर्वी ५ ते ६ हजार रुपायी शुल्क भरावे लागत होते. मात्र यंदा या शुल्कात वाढ करण्यात आली असून तब्बल १५ ते १६ हजार रुपये इतकी वाढ करण्यात आली आहे. इतर विद्यापीठातील विद्यार्थ्यांना १५ ते १७ हजार रुपये शुल्क भरावे लागायचे मात्र यंदा या शुल्कात २९ ते ३० हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
विद्यापीठाने घेतलेल्या शुल्क वाढीच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या संख्येवर परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत राहणाऱ्या विद्यापीठाने प्रवेश शुल्कात दामदुप्पट केलेल्या वाढीमुळे विद्यार्थ्यांची नाराजी ओढवून घेतली आहे.
गेल्या १५ दिवसांपासून ऑनलाईन प्रवेशाची प्रक्रिया सुरु आहे. मात्र २०२२-२३ सालसाठी प्रवेश शुल्कासंदर्भातील माहिती वेबसाईटवर विद्यापीठाने प्रसारित करताच विद्यार्थ्यांना शुल्कवाढीचा धक्का बसला आहे. विद्यापीठाने जाहीर केलेल्या शुल्क वाढीमुळे यंदा विद्यार्थ्यांची संख्या कमी होण्याचीही शक्यता वर्तविण्यात येत आहे.
या शुल्कवाढीबाबत कुलगुरूंनादेखील माहिती नसल्याचे सांगण्यात येत असून भरमसाट शुल्क वाढीविरोधात विद्यार्थी आंदोलन छेडण्याचा तयारीत आहेत. कुलगुरूंनी रजिस्टार यांच्याकडे बोट दाखवत शुल्कवाढीबाबत आपल्याला माहिती नसल्याचे सांगितले आहे.