बेळगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने बेळगाव रिंग रोड विरोधात येत्या 28 नोव्हेंबर रोजी भव्य चाबूक मोर्चा काढण्यात येणार आहे याबाबतची माहिती देणारे निवेदन आज सोमवारी सकाळी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.
बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किनेकर यांच्या नेतृत्वाखाली सादर करण्यात आलेल्या निवेदनाचा जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्यकाने स्वीकार केला. याप्रसंगी माजी महापौर शिवाजी सुंठकर,युवा नेते आर एम चौगुले,माजी जि. पं. सदस्या सरस्वती पाटील, माजी ता. पं. सदस्य सुनील अष्टेकर, आर. आय. पाटील, एम जी पाटील, सुधीर चव्हाण, शाम पाटील, आदींसह समिती कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते. गेल्या कांही दिवसांपासून प्रशासनातर्फे बेळगाव रिंग रोड करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
याला विरोध दर्शवत शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे आक्षेप नोंदविले आहेत. मात्र आता शेतकऱ्यांनी रिंग रोड करण्याचा निर्णय रद्द होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने काही दिवसापूर्वी तालुका म. ए. समितीच्यावतीने आयोजित शेतकऱ्यांच्या बैठकीत रिंगरोडला तीव्र विरोध दर्शवण्यासाठी 28 नोव्हेंबर रोजी भव्य चाबूक मोर्चा काढण्याचे ठरविण्यात आले आहे.
सदर मोर्चा संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना माजी आमदार मनोहर किनेकर म्हणाले की, बेळगाव रिंग रोडसाठी जवळपास 1300 एकर जमीन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण ताब्यात घेणार आहे अशा प्रकारचे नोटिफिकेशन 13 ऑक्टोबर 2022 रोजी हिंदू या इंग्रजी दैनिकात प्रसिद्ध झाले होते. त्यामध्ये त्यांनी नमूद केले होते की ज्या कोणाला स्वतःच्या जमिनीत रस आहे त्यांनी रिंगरोडच्या विरोधात 21 दिवसांमध्ये आक्षेप नोंदवावेत. त्यानुसार 846 सर्व्हे नंबर पैकी 823 जणांनी आक्षेप नोंदविले आहेत. मात्र अशा प्रकारे आक्षेप नोंदवून देखील सरकार हा प्रकल्प रद्द करणार नाही अशी एक भीती शेतकऱ्यांच्या मनात असल्यामुळे चार दिवसांपूर्वी झालेल्या शेतकऱ्यांच्या बैठकीत येथे 28 रोजी चाबूक मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या मोर्चामध्ये संबंधित 32 गावातील शेतकरी सहकुटुंब सहभागी तर होणारच आहेत, शिवाय त्यांना पाठिंबा देण्यासाठी बेळगाव तालुक्यातील सर्व शेतकरी मोर्चा सहभागी होतील. त्याची माहिती देण्यासाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना आज निवेदन सादर केले असे किनेकर यांनी सांगितले.
शेतकऱ्यांचा विरोध लक्षात घेऊन येत्या 10 दिवसात रिंग रोड प्रकल्प रद्द झाला तर ठीक अन्यथा चाबूक मोर्चा होणार हे निश्चित आहे आणि त्यावेळी शेतकरी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरणार असल्यामुळे जर काही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याला सरकार जबाबदार राहील, असेही आम्ही आमच्या निवेदनात नमूद केले आहे. शेतकऱ्यांना उध्वस्त करून विकास साधला जाणार असेल तर तो होऊ दिला जाणार नाही. आम्ही आमच्या जमिनी कोणत्याही परिस्थितीत देणार नाही.
बेळगावची वाहतूक समस्या निवारण्यासाठी रिंग रोडच कशाला हवा? फ्लाय ओव्हर का केला जात नाही? मुंबई, पुणे, बेंगलोर, नागपूर अशा मोठ्या शहरांमध्ये फ्लाय ओव्हर ब्रिज करून वाहतूक समस्येचे निवारण करण्यात आले आहे. रिंग रोडसाठी आम्ही एक इंचही जमीन देणार नाही, मग प्राण गेले तरी बेहत्तर. काळ्या आईला वाचवल्या शिवाय आम्ही गप्प बसणार नाही, अशा भावनेने शेतकरी पेटला आहे आणि त्याची प्रचिती 28 रोजीच्या मोर्चात येईल. तेंव्हा सरकारने बेळगाव रिंग रोड प्रकल्प वेळीच रद्द करावा, असे मत माजी आमदार मनोहर किनेकर यांनी व्यक्त केले.