मराठी भाषिकांच्या नव्या दमाच्या पिढीमध्ये सीमाप्रश्न सोडविण्याची जिद्द निर्माण झाली आहे. त्यांना मागील पिढीने केलेल्या त्यागाच्या शिदोरीवर सीमाप्रश्न सोडवण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे. तेंव्हा त्यांनी पाठपुरावा करून सीमाप्रश्न सोडवावा, अशी सदिच्छा मध्यवर्तीय महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांनी व्यक्त केली.
1 नोव्हेंबर काळा दिनानिमित्त आज सकाळी बेळगाव शहरात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या विराट मूक निषेध फेरीचे मराठा मंदिर येथे जाहीर सभेत रूपांतर झाले. या सभेमध्ये दीपक दळवी बोलत होते. 1 नोव्हेंबर हा कदाचित कर्नाटक सरकारसाठी आम्हाला खिजवण्याचा दिवस आहे. तथापि ते राज्यकर्ते आहेत त्यांना विनंती करण्यापलीकडे आपण कांही करू शकत नाही.
ही लोकशाही आहे, या लोकशाहीत आमच्याबरोबर जे लोक लढले ते कदाचित आता माझ्या वयाचे झालेत. मात्र आमच्या मागून जे तरुण आले त्यांनी आपले भवितव्य आमच्या सोबत बांधून घेतले ही महद्आश्चर्याची घटना आहे. आम्हाला जो मार्ग चोखाळणे शक्य नव्हते, तो मार्ग आजच्या नव्या पिढीने चोखाळला आहे. मागील पिढीने केलेल्या त्यागाच्या शिदोरीवर सीमाप्रश्न सोडवण्याची सुवर्णसंधी या नव्या पिढीला मिळाली आहे. या पिढीने पाठपुरावा करून सीमाप्रश्नाची सोडवणूक करावी ही माझी सदिच्छा, असे दीपक दळवी म्हणाले.
आम्ही फक्त लोकशाहीचा हक्क मानतो. हा हक्क मिळवण्यासाठी काय खस्ता खाव्या लागतात याचे उदाहरण आपल्यासमोर आहे. नव्या पिढीत सीमाप्रश्न सोडविण्याची जिद्द निर्माण झाली आहे. आता आम्हाला करण्यासारखं फारसे कांही शिल्लक नाही.
या लढ्यातून बाजूला सरणं अशी अपेक्षा व्यक्त करणार नाही, परंतु माझ्याबरोबर जिद्दीने सीमाभागातील जनता लढते याचे कौतुक आणि समाधान आहे, असेही दीपक दळवी यांनी स्पष्ट केले. अपघातामुळे प्रकृती खालावली असताना देखील 81 वर्षीय दीपक दळवी यांनी आपले कर्तव्य समजून आजच्या जाहीर सभेला लावलेली हजेरी उपस्थित सर्वांसाठी प्रेरणादायी ठरली होती.