बेळगाव शहरातील टिळकवाडी दुसऱ्या रेल्वे गेट येथील हटवण्यात आलेल्या बस थांब्याचे फुटपाथवरील जमिनीवर आलेले लोखंडी पाईप पादचाऱ्यांसाठी धोकादायक ठरत असून ते त्वरित काढावेत अथवा बुजवावेत अशी मागणी केली जात आहे.
टिळकवाडी दुसऱ्या रेल्वे गेट येथे उद्यमबागच्या दिशेने जाणाऱ्या असणाऱ्या काँग्रेस रोडवर बस थांब्यांचे शेड उभारण्यात आले आहेत. यापैकी एक शेड कांही दिवसांपूर्वी हटविण्यात आले आहे.
तथापि शेड हटवताना या शेडचे फूटपाथवर जमिनीत असलेले लोखंडी खांबांचे पाईप तसेच ठेवण्यात आले आहेत. फुटपाथच्या जमिनीवर बाहेर डोकावणारे हे पाईप पादचाऱ्यांसाठी धोकादायक ठरत आहेत. विशेष करून सायंकाळनंतर रात्रीच्या वेळी तर या ठिकाणी पादचारी अडखळून पडण्याचे, त्यांना इजा होण्याचे प्रकार घडत आहेत.
तरी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन फुटपाथच्या जमिनीवर बाहेर डोकावणारे संबंधित पाईप त्वरित काढण्याचे किंवा बुजवण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी केली जात आहे.
झालेल्या स्मार्ट सिटीच्या कामावर अनेक ठिकाणी टीका होत आहे त्यातच हे बस स्थानकाचे काम देखील धोकादायक ठरण्याची शक्यता आहे.