सध्याच्या हिवाळ्याच्या मोसमात काल शनिवारी सायंकाळी अचानक झालेल्या पावसामुळे भाताची मळणी भिजून कणबर्गी परिसरातील शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून सुधीर शहापूरकर या शेतकऱ्याला सुमारे 70 हजार रुपयांचा फटका बसला आहे.
अलीकडच्या काळात लहरी हवामानाचा अनुभव बेळगावकरांना सातत्याने येत असून आता थंडीच्या दिवसात काल शनिवारी सायंकाळी शहर परिसरात पावसाने अचानक हजेरी लावली.
सध्या शेतकरी वर्ग भाताची सुगी व मळणी करत असतानाच हा पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कणबर्गी भागात भात कापणीसह अनेकांच्या मळण्या सुरू आहेत. त्याप्रमाणे पाटील गल्ली कणबर्गी येथील शेतकरी सुधीर शहापूरकर यांनी आपल्या शेतातील भात कापणी आटोपवून काल मळणीला सुरुवात केली होती. मात्र त्याचवेळी पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे प्रयत्न करून देखील शहापूरकर आपल्या मळणीला भिजण्यापासून वाचवू शकले नाहीत. परिणामी त्यांचे सुमारे 70 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
कालच्या अचानक झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांची एकच तारांबळ उडाली होती. जवळपास दोन तास पडलेल्या अवकाळी पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी होऊन कणबर्गी परिसरातील प्रत्येक भात उत्पादक शेतकऱ्यांचे जवळपास 60 -70 हजार रुपयांचे याप्रमाणे एकूण लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
बेळगाव तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या भात मळण्या पावसात सापडल्यामुळे त्यांचे प्रचंड नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. या पद्धतीने भाताचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्यामुळे आगामी काळात बाजारपेठेतील तांदळाचा दर आणखी वाढणार असल्याचे जाणकारांचे मत आहे.