नोव्हेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्याला सुरुवात होण्याबरोबरच थंडीचा कडाका वाढला आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यानंतरच थंडीची चाहूल बेळगाव लागली होती.
मात्र आता आज शनिवार 19 रोजी थंडीत अधिकच वाढ झाली आहे. आज सकाळी तापमान 12.0 अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले असून ते सर्वसामान्य तापमानापेक्षा -5 अंश सेल्सिअस कमी आहे.
थंडी वाढल्यामुळे आज सकाळच्या सत्रात अनेकांनी गरम कपडे परिधान करून राहण्याचे पसंत केले. शहराच्या उपनगरात थंडीची मजा लुटण्यासाठी सकाळी फिरावयास जाणाऱ्यांची संख्या देखील वाढली होती.
थंडीमुळे फक्त पहाटेच नव्हे तर आज दिवसा बऱ्याच जणांच्या अंगावर गरम कपडे पहावयास मिळत होते. ऊन असले तरी हवेत गारठा जाणवत होता. त्यामुळे वयस्कर नागरिकांनी कानटोप्या घालून उबदार कपड्यातच राहणे पसंत केल्याचे आढळून येत होते.
यापूर्वी सर्वात कमी म्हणजे किमान तापमान गेल्या 22 जानेवारी 1984 रोजी 6.4 अंश सेल्सिअस इतके नोंद झाले होते, तर सर्वाधिक 47 अंश सेल्सिअस तापमान 2010 साली नोंदविले गेले होते. आता या मोसमात थंडी होईल हे पहावे लागणार आहे.