शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या बेळगावच्या नियोजित रिंगरोड विरोधात येत्या सोमवार दि. 28 नोव्हेंबर रोजी काढण्यात येणाऱ्या भव्य चाबूक मोर्चाला संपूर्ण पाठिंबा द्यावा, अशी विनंती बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे बेळगाव बार असोसिएशनला करण्यात आली आहे.
तालुक्यातील शेतकऱ्यांना उध्वस्त करणाऱ्या बेळगाव रिंगरोडचा प्रकल्प रद्द करण्यात यावा या मागणीसाठी येत्या दि. 28 नोव्हेंबर रोजी बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा भव्य चाबूक मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चामध्ये रिंगरोडच्या गावातून जाणार आहे त्या गावातील शेतकरीच नव्हे, तर संपूर्ण तालुक्यातील शेतकऱ्यांचा सहभाग असणार आहे. याखेरीज विविध संघ -संस्था आणि संघटनांनी या मोर्चाला पाठिंबा द्यावा, यासाठी तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती प्रयत्नशील आहे. त्याच अनुषंगाने तालुका म. ए. समितीने बेळगाव बार असोसिएशनकडे मोर्चाला पाठिंबा देण्याची विनंती केली आहे. तशा आशयाचे निवेदन समितीच्या पदाधिकारी व सदस्यांनी आज सोमवारी सकाळी न्यायालय आवारातील सभागृहात कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किनेकर यांच्या नेतृत्वाखाली बेळगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. प्रभू यतनट्टी आणि उपाध्यक्ष ॲड. सुधीर चव्हाण यांना सादर केले.
याप्रसंगी समितीचे नेते माजी महापौर शिवाजी सुंठकर, एस. एल. चौगुले, आर. आय. पाटील, दीपक पावशे, ॲड. एम. जी. पाटील, ॲड. प्रसाद सडेकर आदी उपस्थित होते. दरम्यान, नियोजित बेळगाव ते धारवाड रेल्वे पट्ट्यातील भूसंपादनाकरिता नोटीस पाठवलेल्या शेतकऱ्यांनीही 28 नोव्हेंबरच्या चाबूक मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन कोणत्याही प्रकारच्या भूसंपादनाला विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मोर्चासह रिंगरोड विरोधातील लढ्याला बळ मिळणार आहे.