बेळगाव : घटप्रभा येथे राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांच्या वाहनाला घेराव घालून जारकीहोळी समर्थकांनी केलेल्या आंदोलनातील आठ कार्यकर्त्यांवर एफआयआर नोंदविण्यात आला आहे.
घटप्रभा येथे राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांच्या वाहनाला घेराव घालून सतीश जारकीहोळी समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. ११ नोव्हेंबर रोजी झालेल्या या प्रकरणांत रेहमान मोकाशी, वसंत रानाप्पगोळ, गणपती कोराव्वागोळ, मंजुळा रामगानट्टी, मार्कंडेय महिमगोळ, रवी नावी, काडेश तेळगेरी, नवीन मादर यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. याचप्रमाणे ८ ते १० अज्ञातांवरदेखील भादंवि कलम १४३, १४७, ३४१, सहकलम १४९ नुसार घटप्रभा पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
मानव बंधुत्व वेदिकेच्या कार्यक्रमात व्यासपीठावरून बोलताना केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी “हिंदू” या शब्दाची व्याख्या सांगताना वादग्रस्त विधान केले होते. यावरून भाजप नेते आणि हिंदू संघटनांनी जोरदार विरोध दर्शविण्यास सुरुवात केली.
याचदरम्यान सतीश जारकीहोळी यांच्या समर्थनार्थ अनेक दलित संघटना आणि जारकीहोळी समर्थक रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यासाठी सज्ज झाले. सतीश जारकीहोळी यांच्या विधानाला आपला पाठिंबा दर्शवत भाजप नेत्यांविरोधात घोषणाबाजी करत ११ नोव्हेंबर रोजी राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांच्या वाहनाला घेराव घालण्यात आला होता.
यावरून पुन्हा राजकारण तापले होते. दरम्यान शनिवारी बेळगावमधील सर्किट हाऊस मध्ये झालेल्या भाजप नेत्यांच्या बैठकीनंतर इराण्णा कडाडी यांनी याप्रकरणी प्रतिक्रिया देताना, सदर आंदोलन आणि आंदोलकांबाबत स्थानिक पोलिसांना पाऊल उचलण्याच्या सूचना दिल्याचे सांगितले होते. यानंतर सोमवारी सदर आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.