बेळगाव लाईव्ह विशेष :कोल्हापूर येथे कर्नाटक आणि महाराष्ट्र या दोन राज्यांचे राज्यपाल आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या समन्वय बैठकीमध्ये अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. सीमेवरच्या दोन्ही जिल्ह्यांमध्ये दिशादर्शक फलक दोन्ही भाषेत म्हणजेच कन्नड आणि मराठी भाषेत असावेत यावर दोन्ही राज्यातील राज्यपालासह अधिकाऱ्यांनी सहमती दर्शवली.
बेळगावसह सीमाभागामध्ये मराठी भाषिकांची मोठी संख्या आहे. बेळगाव हे असे महत्त्वपूर्ण गाव आहे की दक्षिण भारतात किंवा गोव्याकडे त्याचबरोबर उत्तर भारतात आणि पूर्व पश्चिम भारतात कुठेही जायचे असेल तर सर्वसाधारण बेळगावला यावंच लागतं अनेक पर्यटक बेळगाव वरूनच गोव्यात जाणे पसंत करतात किंवा दक्षिण भारतात जाण्यासाठीही बेळगाव वरूनच प्रवास करतात. त्याचबरोबर ग्राहक व व्यावसायिक सुद्धा बेळगावला मोठ्या प्रमाणात येतात.
बेळगावचे एअरपोर्ट हे भारतातील व्यस्त एअरपोर्टमध्ये गणले जाते. अशा पद्धतीने बेळगाव हे केवळ एक छोटं शहर किंवा राज्यापुरतं मर्यादित न राहता देशस्तरिय दर्जा मिळालेलं गाव झालेलं आहे. अशावेळी केवळ एकाच भाषेत दिशादर्शक फलक लावून त्याला परत सीमित करण्याचा जो प्रयत्न काही लोकांच्याकडून होतो तो चुकीचा आहे. कारण विविध भाषा जाणनारे लोक बेळगाव मध्ये ये जा करतात आणि त्यावेळी त्यांना सहजपणे वावर करण्यासाठी किंवा पुढील प्रवासासाठी त्यांना मार्गदर्शक फलकांची गरज असते, त्या दृष्टिकोनातूनही विचार केला तर बेळगावला मराठीसह अनेक भाषांत बोर्ड लावणे गरजेचे आहे.
बेळगावात अट्टाहासाने केवळ कन्नडचा वापर केला तर बाहेरून येणाऱ्यांना मोठा फटका बसतो त्याचबरोबर त्यांना गोंधळल्यासारखे परिस्थिती निर्माण होते त्यामुळे वाहतूक कोंडी होते.या सगळ्यातून मार्ग काढायचा असेल तर अनेक मेट्रो पॉलीटिन सिटी प्रमाणे वेगवेगळ्या भाषेतील बोर्ड लावणे गरजेचे आहे आणि भाषिक अल्पसंख्यांक आयोगाच्या नियमाप्रमाणे कोणत्याही जिल्ह्यांमध्ये 18% ज्या भाषेचे लोक आहेत त्या जिल्ह्यामध्ये त्या भाषेमध्ये फलक लावणे, शासकीय परिपत्रक देणे हा कायदा आहे आणि बेळगाव जिल्ह्यात तर 21 टक्क्यांहून अधिक मराठी भाषिक आहेत आणि ही मागणी जुनीच आहे त्यामुळे बेळगाव तालुका खानापूर तालुका या सीमा भागातील मराठी भाषिकांना मराठीत फलक लागले तर त्याचा जनतेला फायदाच होईल.
कोल्हापूर येथे कर्नाटकचे राज्यपाल व महाराष्ट्राचे राज्यपाल यांची संयुक्त बैठक झाली अनेक विषयाबरोबर ह्याही विषयाची चर्चा झाली आणि दोन्ही राज्यपालांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद दाखवला. त्या गोष्टीचा विचार करून अशा पद्धतीचे फलक लावणे गरजेचे आहे त्याचबरोबर कर्नाटक राज्याने हे लक्षात घेतलं पाहिजे की हे भारतातील एक महत्त्वपूर्ण राज्य आहे आणि बेळगाव हे आघाडीचे औद्योगिक व व्यावसायिक गाव आहे . बेळगावचा फाउंड्री उद्योग जगात प्रसिद्ध आहे. त्यामुळे बेळगावात अनेक लोक येतात त्या लोकांच्या सोयीसाठी आणि एकंदर शहराच्या विकासासाठी, राज्याच्या विकासासाठी अनेक भाषेत बोर्ड लावले गेले पाहिजेतच.