श्रीक्षेत्र दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिर आणि इन्फिनिटी फिल्म प्रोडक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘स्वर सप्त सुरांचे.. नाद भजनाचे’ ही भव्य भजन गायन स्पर्धा आणि दीपोत्सवाचा कार्यक्रम काल बुधवारी सायंकाळी मोठ्या उत्साहात पार पडला. भजन स्पर्धेचे प्रथम क्रमांकसह विजेतेपद कोल्हापूरच्या पेठ वडगाव येथील श्री माऊली भजनी मंडळाने हस्तगत केले.
श्रीक्षेत्र दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिर आणि इन्फिनिटी फिल्म प्रोडक्शन यांच्यातर्फे गेल्या 19 नोव्हेंबर पासून सलग चार दिवस ‘स्वर सप्त सुरांचे.. नाद भजनाचे’ ही भव्य बक्षीस रकमेची भजन गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ काल बुधवारी सायंकाळी नव्या कपिलेश्वर तलावाच्या ठिकाणी मोठ्या दिमाखात पार पडला.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेत बाजी मारून प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या श्री माऊली भजनी मंडळ पेठ वडगाव कोल्हापूर यांना रोख 25,000 रुपये व स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले. सदर भजन गायन स्पर्धेत थळेश्वर भजनी मंडळ हंदिगनूर बेळगाव, माऊली भजनी मंडळ व्हनाळी कागल, श्री विठ्ठल रुक्मिणी भजनी मंडळ कुद्रेमनी बेळगाव आणि स्वरानंद कला मंच कंग्राळी खुर्द बेळगाव यांनी अनुक्रमे दुसरा, तिसरा, चौथा आणि पाचवा क्रमांक पटकावला.
या भजनी मंडळांना अनुक्रमे 20,000 रुपये 15,000 रुपये 10,000 रुपये आणि 5,000 रुपये बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. बक्षीस वितरण समारंभा नंतर गजर टाळ मृदुंगाचा हा संगीताचा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी शहरातील नागरिक भाविक आणि वारकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.
सदर बक्षीस वितरण समारंभ बरोबरच श्री क्षेत्र दक्षिणकाशी कपिलेश्वर मंदिरातर्फे दीपोत्सवाचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्तिक अमावस्येनिमित्त मंदिरामध्ये अभिषेक, पालखी, आरती आदी विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. या कार्यक्रमास स्थानिक भाविकांसह भजन गायन स्पर्धेत सहभागी झालेल्या परगावच्या भजनी मंडळातील सदस्यानी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. दीपोत्सवानिमित्त श्री कपिलेश्वर मंदिर आवारात सर्वत्र हजारो दीप प्रज्वलित करण्यात आल्यामुळे परिसर उजळून निघाला होता.
भजन गायन स्पर्धा आणि दीपोत्सव यामुळे काल बुधवारी सायंकाळी मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी होऊन यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. उपरोक्त स्पर्धा व दीपोत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी श्री कपलेश्वर मंदिराच्या विश्वस्त मंडळासह सेवेकर्यांनी विशेष परिश्रम घेतले.