हुक्केरी तालुक्यातील बेल्लद बागेवाडी या गावातील एका असहाय्य वृद्ध महिलेचा खून केल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. हुक्केरी पोलिसांनी हि कारवाई केली असून आज बेळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजीव पाटील यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली.
बेल्लद बागेवाडी येथील मल्लव्वा जीवाप्पा कमते नामक ७५ वर्षीय वृद्ध महिलेचा मृतदेह एका घरात आढळला होता. याप्रकरणी शवविच्छेदनादरम्यान अनैसर्गिक मृत्यू अशी नोंद करण्यात आली होती. या प्रकरणाच्या तपासादरम्यान सदर वृद्ध महिलेचा खून तिचा गळा आवळून करण्यात आल्याची माहिती समोर झाली.
याप्रकरणी १३ ऑक्टोबर रोजी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर वृद्ध महिलेच्या पतीचे १० वर्षांपूर्वी निधन झाले होते. वर्षभरापूर्वीच सदर महिला बेल्लद बागेवाडी येथे एका खोलीत वास्तव्यास रहात होती. नेहमीप्रमाणे आपल्या आजीला जेवणाचा डबा देण्यासाठी येणाऱ्या तिच्या नातवाला आपल्या आजीचा मृतदेह दिसला. याप्रकरणी हुक्केरी सीपीआय मोहम्मद रफिक तहसीलदार आणि गोकाकचे डीएसपी मनोजकुमार नाईक यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाने तपास सुरु केला.
सदर खून प्रकरणानंतर आरोपींनी पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. जमिनीच्या कौटुंबिक वादातून हा खून झाला असल्याचे भासविण्यात आले होते. मात्र पोलिसांनी या प्रकरणाचा तपास वेगळ्या पद्धतीने करत या प्रकरणाचा उलगडा केला आहे.
७ वर्षांपूर्वी एका खुनाच्या गुन्ह्यात सहभागी झालेल्या आरोपीने अशाचप्रकारे दोरीने गळा आवळून खून केला होता तर रायबाग तालुक्यातील नंदीकुरळी गावातील आरोपीने ५० हजार रुपयांसाठी हा खून केला आहे. सदर आरोपीने वृद्ध महिलेकडून ५० हजार रुपये उसने घेतले होते. मुद्दल परत करण्याची मागणी करण्यात आल्यानंतर त्याने वृद्ध महिलेशी हुज्जतही घातली होती. इतकेच नाही तर दुसऱ्या आरोपीने पहिल्या आरोपीकडून १० हजार रुपयांचे कर्जही घेतले आहे. या दोघांनीही मिळून वृद्ध महिलेच्या खुनाचा कट रचून काटा काढला आहे.
६ ऑक्टोबर रोजी वृद्ध महिलेच्या घरी येऊन पैशांच्या विषयांवर चर्चा देखील करण्यात आली. जोरदार पावसामुळे वृद्ध महिलेच्या घरातील शौचालयात साचलेले पाणी काढण्यासाठी दोन्ही आरोपींनी महिलेला मदत केली आणि या गोंधळात वेळ झाल्याने त्याचठिकाणी दोघांच्या झोपण्याचीही व्यवस्था वृद्ध महिलेने केली. झोपी गेलेल्या वृद्ध महिलेचा दोरीने गळा आवळून दोघांच्या साथीने हा खून झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.
यावेळी वृद्ध महिलेच्या घरात शोधाशोध केली असता २० ग्राम सोने देखील सापडले आहे. खुनाचा संशय तिच्या मुलांच्या बाजूने वळावा यासाठी आरोपींनी जमिनीच्या कागदपत्रांचा वापर मोठ्या शिताफीने केला. मात्र तपासाअंती पोलिसांना खऱ्या आरोपींची माहिती मिळाली असून या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.