महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा नेतृत्व आणि सॉफ्टवेअर इंजिनियर असलेले भांदूर गल्ली येथील रहिवासी अमित देसाई यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश पातळीवरील इंजिनिअर सेलच्या निमंत्रक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे इंजिनियर सेलचे राज्य समन्वयक म्हणून त्यांची नियुक्ती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे.
माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली आणि विरोधी पक्ष नेते अजित दादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सदर नियुक्ती करण्यात आली आहे.
अमित देसाई हे बेळगावात महाराष्ट्र समितीचे धडाडीचे नेतृत्व आहे. महाराष्ट्रात इंजिनिअर सेलच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस बळकट करण्याची मोठी जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली आहे.
गेल्या महिन्याभरापूर्वी त्यांनी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, विरोधी पक्ष नेते अजित दादा पवार, राष्ट्रवादीचे अध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत इंजिनिअर सेल स्थापन करण्याबाबत व पक्ष संघटनेसाठी याची उपयुक्तेबाबत प्रभावी मॉडेल प्रेझेंटेशन यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथे दिले होते. त्यानंतर त्यांची पक्ष संघटना बळकटीसाठी नियुक्ती झाली आहे.
शिर्डी येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन दिवसीय पक्ष चिंतन शिबिरात देसाई यांनी इंजिनिअर सेलच्या उपयुक्ततेबाबत प्रभावी सादरीकरण केले. आता त्यांना महाराष्ट्रभर फिरून पक्ष संघटना बळकट करण्याची जबाबदारी या माध्यमातून देण्यात आली आहे.
अमित देसाई यांची प्रदेश पातळीवरील इंजिनिअर सेलच्या निमंत्रक पदी नियुक्ती झाल्याने महाराष्ट्र एकीकरण समिती आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील संपर्क अधिक बळकट होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस नेहमीच बेळगाव येथील सीमा बांधवांच्या पाठीशी राहिलेला पक्ष आहे. बेळगावच्या युवकाची त्या पक्षातील प्रमुख पदावर नियुक्ती झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस व बेळगावच्या मराठी माणसाच्या संपर्क साधन म्हणून अधिक बळकटी मिळणार आहे.