आगामी विधानसभा निवडणुकीसाठी बेळगाव उत्तर मतदारसंघातून काँग्रेसचे तिकीट मिळवण्यासाठी बेंगलोर येथील केपीसीसी कार्यालयाच्या ठिकाणी जणू स्पर्धा सुरू झाली असून माजी आमदार फिरोज सेठ आणि राजू शेठ या दोघांनी उमेदवारीसाठी अर्ज केले आहेत. फिरोज सेठ यांचे पुत्र फैजान सेठ यांनी देखील केपीसीसी कार्यालयातून उमेदवारी अर्ज घेतला असला तरी तो अद्याप दाखल केलेला नाही.
बेळगाव उत्तर मतदारसंघांमध्ये काँग्रेसकडून उमेदवारी कोणाला मिळणार याची चर्चा आतापासून सुरू झाली आहे. मागील विधानसभा निवडणुकीत बेळगाव उत्तर मतदार संघातून काँग्रेसच्या तिकिटावर दोन वेळा विजयी झालेल्या फिरोज सेठ यांचा ॲड. अनिल बेनके यांनी पराभव केला.
त्यामुळे यावेळी या मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवारी बदल होणार का? अशी चर्चा सुरू असताना सध्या सुरू झालेल्या अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत माजी आमदार फिरोज सेठ आणि त्यांचे बंधू राजू शेठ या दोघांनीही पक्षाकडे उमेदवारीसाठी अर्ज केला आहे.
प्रारंभी गेल्या चार-पाच महिन्यापूर्वी फिरोज शेठ यांनी आपणच काँग्रेसतर्फे निवडणूक लढवणार असे जाहीर केले होते. मात्र आता गेल्या दोन-तीन वर्षापासून सक्रिय राजकारणात असलेल्या राजू शेठ यांनी देखील फिरोज यांच्या समवेत उमेदवारीसाठी अर्ज केला आहे.
काँग्रेसच्या तिकिटासाठी अर्ज करण्याचा काल शेवटचा दिवस असला तरी ती मुदत शेवटच्या क्षणी वाढविण्यात आल्यामुळे आज गुरुवारी काही प्रमुख नेते मंडळींनी अर्ज दाखल केले. याखेरीज आणखी कांही जण उद्या शुक्रवारी उमेदवारीसाठी अर्ज करणार आहेत. बेळगाव उत्तर मतदारसंघातून फिरोज सेठ व राजू सेठ यांनी अर्ज दाखल केले असले तरी फैजान सेठ यांनी अद्याप आपला अर्ज दाखल केलेला नाही. त्यांनी तो अर्ज जर दाखल केला तर सेठ कुटुंबातच तिघांमध्ये काँग्रेसच्या उमेदवारी मिळवण्यासाठी चुरस निर्माण होणार आहे.
सेठ कुटुंबीय वगळता बेळगाव उत्तर मतदार संघातून काँग्रेसच्या तिकिटासाठी अनेकजण इच्छुक आहेत. हाशम भावीकट्टी, अजीम पटवेगार, सादिक अंकलगी या तीन मुस्लिम उर्दू भाषिकांनीही काँग्रेस उमेदवारीसाठी अर्ज केले आहेत. काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष असलेले विनय नावलगट्टी हे उद्या बेळगाव उत्तर मतदारसंघातून पक्षाचे तिकीट मिळावे यासाठी अर्ज दाखल करणार आहेत. माजी मंत्री व पंचमसाली लिंगायत समाजाचे नेते ए. बी. पाटील हे आपल्या हक्केरी मतदारसंघासह बेळगाव उत्तर मतदारसंघातून काँग्रेस उमेदवारीसाठी अर्ज करणार असल्याचे समजते.
सौंदत्ती मतदारसंघातून विश्वास वैद्य, पंचनगौडरू सौरभ चोप्रा आणि उमेश बाळी हे काँग्रेसच्या उमेदवारीसाठी इच्छुक असून त्यांनी अर्जही दाखल केल्याचे कळते. काँग्रेस उमेदवारीसाठी इच्छुक असणाऱ्यांना अर्जासोबत 2 लाख रुपयाच्या स्वरूपातील देणगी केपीसीसी कार्यालयात जमा करावी लागत आहे हे विशेष होय.