बेळगाव तालुक्यामध्ये सुगी हंगामातील भात कापणी, भात बांधणी आणि मळणीच्या कामांना वेग आला असून सांबरा परिसरात कडपाल पेरणीही सुरू झाली आहे. सर्वत्र एकदाच सुगी सुरू झाल्याने मजुरांचा तुटवडा प्रकर्षाने जाणवत आहे.
गतवर्षी परतीच्या पावसामुळे भात पिकांचे नुकसान झाले होते. त्यामुळे यंदा कांही शेतकऱ्यांनी उशिराने सुगीला सुरुवात केली आहे. तालुक्यात भात क्षेत्र अधिक प्रमाणात असून पश्चिम, पूर्व, दक्षिण आणि उत्तर भागात देखील सुगी हंगामाला जोर आला आहे. अलीकडच्या काळात यांत्रिकीकरणाचा वापर वाढल्यामुळे भात कापणीपासून भात वारे देण्यापर्यंत यंत्राचा वापर वाढला आहे.
परिणामी शेतकऱ्यांना अधिक पैसे मोजावे लागत आहेत. बैलगाड्यांची जागा ट्रॅक्टरने, खळ्याची जागा ताडपत्रीने तर नैसर्गिक वारे देण्याऐवजी यंत्राने वारे दिले जात आहेत. एकंदर मळणीच्या कामात यंत्राचा वापर वाढल्याचे पहावयास मिळत आहे. यामध्ये श्रम आणि वेळेची बचत होत असली तरी पैसे जादा जात असल्यामुळे यंत्राची मळणी शेतकऱ्यांसाठी आर्थिक दृष्ट्या भुर्दंड वाढवणारी ठरत आहे.
भात कापणी भात बांधणी आणि मळणीची कामे सुरू झाल्यामुळे मजुरांचा तुटवडा जाणवू लागला आहे. कांही शेतकरी कुटुंबे एकत्रित मळणी हंगाम साधताना दिसत आहेत.
सुगीचा हंगाम सुरू असतानाच सध्याच्या ढगाळ वातावरणामुळे सांबरा व आसपासच्या परिसरात कडपाल पेरणीला वेग आला आहे. मसूर, वाटाणा, हरभरा, ज्वारी आदींची पेरणी केली जात आहे. याबरोबरच काही ठिकाणी भाजीपाला लागवडीसाठी शेती कसण्याची तयारी सुरू झाली. रब्बी हंगामात भाजीपाला अधिक प्रमाणात लागवड केला जातो. त्यामुळे सध्या शेतीची मशागत देखील सुरू झाली आहे.