बेळगाव कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्नावर पुढे ढकलण्यात आलेली तारीख निश्चित झाली असून पुढील बुधवारी म्हणजे सुनावणी 30 नोव्हेंबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे. या सुनावणीत कर्नाटकाच्या फेरविचार याचिकेवर निर्णय होण्याची शक्यता आहे.
30 ऑगस्ट रोजी झालेल्या सीमा प्रश्नाच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने 23 नोव्हेंबर रोजी पुढील सुनावणी घेण्याचा आदेश दिला होता. पण 23 नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती अनुपस्थित राहिल्यामुळे सुनावणी लांबणीवर पडली होती.
महाराष्ट्राचे एडवोकेट ऑन रेकॉर्ड शिवाजी जाधव यांनी शुक्रवारी सीमा प्रश्नावर तातडीने सुनावणी घेण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता.
त्या अर्जाची दखल घेत आज न्यायालयाने 30 नोव्हेंबर रोजी पुढील सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला आहे.
कर्नाटकाने सीमा प्रश्नाचा दावा सर्वोच्च न्यायालयात चालू शकत नाही अशी याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आता 30 नोव्हेंबर रोजी निर्णय होणार आहे.
त्यामुळे ही सुनावणी महत्त्वाची असून महाराष्ट्राने ज्येष्ठ विधीज्ञ वैद्यनाथन यांची नियुक्ती केली आहे. तर कर्नाटकानेही अतिरिक्त वकिलांची फौज तयार केली आहे. त्यामुळे तीस नोव्हेंबर रोजी होणारी सुनावणी अतिशय महत्त्वाची असणार आहे.आता 30रोजी कोणत्या खंडपीठासमोर हा युक्तिवाद होणार आहे हे देखील लवकरच समजणार आहे.