Thursday, December 19, 2024

/

भाजप नेत्यांच्या सभेत ‘त्या’ घटनेवर चर्चा नाही : इराण्णा कडाडी

 belgaum

बेळगावमधील सरकारी अतिथी गृहात आयोजिण्यात आलेल्या तातडीच्या बैठकीत काल घटप्रभा येथे झालेल्या जारकीहोळी समर्थकांच्या आंदोलनावर चर्चा होईल, अशी शक्यता वर्तविण्यात आली होती. मात्र सुमारे तीन तास झालेल्या बैठकीत घटप्रभा येथील घटनेवर चर्चाच झाली नसल्याचा खुलासा राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांनी केला.

बेळगावमध्ये सलग तीन तास माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी, माजी आमदार संजय पाटील, विधान परिषदेचे सरकारचे माजी मुख्य सचेतक महांतेश कवटगीमठ, आमदार महांतेश दोड्डगौडर यांच्यासह बेळगावमधील सर्व भाजप नेते, आजी माजी आमदार, खासदार, पदाधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.

दरम्यान तातडीने बोलाविण्यात आलेल्या बैठकीत घटप्रभा येथे राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांच्या वाहनाला घेराव घालून जोरदार घोषणाबाजी आणि निदर्शने केलेल्या जारकीहोळी समर्थकांना प्रत्त्युत्तर देण्यासंदर्भात चर्चा होईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र या घटनेवर आपण चर्चाच केली नसल्याचे कडाडी यांनी पत्रकारांना सांगितले.

सदर घटनेनंतर आपल्याला शेकडो जणांचे फोन आले. पक्षातील विविध पदाधिकाऱ्यांनी संपर्क साधून घटनेची विचारपूस केली. मात्र जारकीहोळी समर्थकांनी केलेले आंदोलन हे पूर्वनियोजित होते, आपण या मार्गावरून मार्गस्थ होणार याची माहिती त्यांना आधीच देण्यात आली होती. आणि घटप्रभा येथे एका कार्यक्रमासाठी जात असताना आपल्या वाहनाला जारकीहोळी समर्थकांनी घेराव घातला.

आपल्या वाहनाला घेराव घालणारे आंदोलक हे निष्पाप असून त्यांची दिशाभूल करून त्यांना सदर आंदोलन करण्यासाठी सांगण्यात आले होते, असा आरोपही कडाडी यांनी केला. आंदोलनात सहभागी झालेले आंदोलक कोण होते हे आपल्याला माहित आहे. आपल्याला पाहून काही आंदोलक बाजूलाही हटले. मात्र बहुतेक आंदोलकांच्या डोक्यात चुकीच्या गोष्टी भरविण्यात आल्याचे आपल्या निदर्शनात आले, असेही कडाडी म्हणाले.

आपल्याला हा विषय अधिक ताणायचा नसून सदर आंदोलकांना समज देण्यासंदर्भात स्थानिक पोलिसांना कळविण्यात आले असून आपण त्यांच्याविरोधात कोणतीही तक्रार करणार नसल्याचेही इराण्णा कडाडी यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.