राज्यातील भाजप सरकार सर्व क्षेत्रात बेळगाव जिल्ह्याला सावत्र वागणूक देत आहे असा आरोप करून त्याच्या निषेधार्थ आम आदमी पक्षातर्फे (आप) आज गुरुवारी सकाळी आंदोलन छेडून मुख्यमंत्र्यांच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.
आम आदमी पक्षाचे युवा नेते राजीव टोपण्णावर यांच्या नेतृत्वाखाली आज गुरुवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजप सरकार विरोधात निदर्शने करण्यात आली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेले निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले जिल्हाधिकाऱ्यांच्या सहायकांनी निवेदनाचा स्वीकार करून ते तात्काळ बेंगलोरला धाडण्याचे आश्वासन दिले.
याप्रसंगी प्रसारमाध्यमांशी बोलताना राजीव उर्फ राजू टोपण्णावर म्हणाले की, गेल्या कांही महिन्यांपासून आम्ही आमच्या आम आदमी पार्टीतर्फे राज्यातील भाजप सरकारकडून बेळगावला जी सावत्र वागणूक दिली जात आहे त्याच्या विरोधात आवाज उठवत आहोत.
आतापर्यंत बऱ्याच वेळा बेळगावसाठी असलेले चांगले विकास प्रकल्प शेजारील जिल्ह्यांकडे वळविण्यात आले आहेत. आजचे हे आंदोलन आम्ही बेळगाव जिल्ह्यातील युवा पिढी आणि उद्योजकांच्यावतीने करत आहोत. आपल्याकडे बेळगावात स्टार्टअप पद्धत अंमलात आणण्याच्या दृष्टीने पूरक वातावरण, पर्यावरण आहे. मात्र गेल्या 6 महिन्यात बेळगाव, हुबळी, धारवाडसाठी असलेले स्टार्टअप क्लस्टर या प्रकल्पातील बहुतांश उपक्रम हुबळी -धारवाड येथे राबविले जात आहेत. त्यासाठीचे लाभार्थी हुबळी -धारवाडचे आहेत. त्यात बेळगावचे लाभार्थी नाहीत.
स्टार्टअप लॉन्च पॅड देखील बेळगाव जिल्हा ऐवजी शेजारील जिल्ह्यांना देण्यात आले आहे. वंदे भारत एक्सप्रेस बेंगलोरपासून हुबळीपर्यंतच करण्यात आली आहे. बेळगावची लोकसंख्या जास्त असल्याने ती बेळगावपर्यंत सुरू करावी, अशी आमची मागणी आहे. या खेरीज धारवाड व तुमकुरसाठी विशेष गुंतवणूक क्षेत्र (स्पेशल इन्व्हेस्टमेंट झोन) जाहीर करण्यात आले आहे. ते बेळगावसाठी देखील जाहीर करावे अशीही आमची मागणी आहे. कारण बेळगाव हे राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक कर भरणारे शहर आहे. निर्यातीच्या बाबतीतही बेळगाव आघाडीवर आहे.
याखेरीज काल मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सहा हायटेक शहरांसंदर्भात घोषणा केली आहे. बेळगाव जिल्ह्यातील युवा पिढी आणि उद्योजकांची इच्छा व हित लक्षात घेऊन आणखी एक हायटेक शहर स्थापण्यात यावे अशी आमची विनंती आहे असे सांगून थोडक्यात राज्यातील भाजप सरकारने बेळगाव शहर व जिल्ह्याला सापत्न वागणूक देणे सोडावे आणि बेळगावचा योग्य आदर करावा, अशी आमची मागणी आहे असे राजीव टोपण्णावर यांनी शेवटी स्पष्ट केले.