विकास कामांना प्राधान्य देणे आणि वेगवेगळे उपक्रम राबवून ते यशस्वी करण्यासाठी येळ्ळूर ग्रामपंचायत नेहमीच प्रयत्नशील असते. सर्वांगीण विकास लक्षात घेऊन बेळगाव जिल्ह्यातून या ग्रामपंचायतीला ‘मॉडेल ग्रामपंचायत’ करण्याचा सरकारचा मानस असल्यामुळे त्यासंदर्भातील येळ्ळूर ग्रामपंचायतची बैठक काल शुक्रवारी पार पडली.
मॉडेल ग्रामपंचायती अंतर्गत दूरदृष्टी या योजनेला पूर्णत्वास नेण्यासाठी येळ्ळूर ग्रामपंचायतची निवड करण्यात आली आहे. या दृष्टिकोनातून येळ्ळूर ग्रामपंचायत सदस्य, शिक्षक, आरोग्य अधिकारी तसेच आशा कार्यकर्ते यांनी येळ्ळूरमधील प्रत्येक वॉर्डमध्ये जाऊन तेथील लोकांच्या समस्या जाणून त्या लेखी स्वरूपात लिहून घेतल्या.
यामध्ये शैक्षणिक अडचणी, रस्त्याचे काम, गटारीचे काम किंवा इतर काही पेन्शन वगैरे सारख्या समस्यांचा समावेश आहे. या समस्यांचे निवारण करण्यासाठी ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश बा. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच दूरदृष्टी योजनेअंतर्गत पुढील 5 वर्षातील विकासकामांसाठी नेमके कोणते आणि कसे उपक्रम राबवले जातील याविषयी, तसेच येळ्ळूर ग्रामपंचायत समोर येळ्ळूर गावाच्या आराखड्याची प्रतिकृती काढून त्यामध्ये कुठे आणि कशा पद्धतीने रस्ते, गटारी, किंवा इतर विकास कामांना गती देता येईल याविषयी चर्चा करण्यात आली.
बैठकीत येळ्ळूर गावच्या चारी बाजूंनी रिंग रोड तयार करणे, गावातील सर्व जूने बोळ व्यवस्थित करून खुले करणे, सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, स्मशान आणि सार्वजनिक ठिकाणी सोलार बसवणे, सार्वजनिक ठिकाणी आसन व्यवस्था निर्माण करणे, गावातील नागरिकांसाठी सार्वजनिक शौचालय बांधणे, गावामध्ये बस स्टॅन्ड निर्माण करणे, तसेच गावच्या विस्तारित लोक वस्तीत पथदीप, रस्ते, गटार निर्माण करणे, गावातील ग्रामपंचायत मालमत्ता संरक्षणासाठी भिंत बांधणे आणि गावातील मेन शिवाजी रोडला वॉकिंग ट्रॅक निर्माण करणे याविषयी चर्चा करण्यात आली. यावेळी ता. पं. अधिकारी बी. एच. बजंत्री यांनी दूरदृष्टी योजनेविषयी माहिती देत पुढील 5 वर्षात विकासाच्या दृष्टीने नेमकी कोणती पावले उचलली पाहिजेत? या संदर्भात मार्गदर्शन केले. याखेरीज सरकारच्या वेगवेगळ्या योजना आणि उपक्रमांविषयी माहिती दिली.
ग्रा. पं. अध्यक्ष सतीश बा. पाटील म्हणाले येळ्ळूर ग्रामपंचायतीने सरकारच्या प्रत्येक योजनेचा लाभ गावातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केला आहे. आम्ही नेहमीच विकास कामांना प्राधान्य दिले आहे. या दृष्टिकोनातून मॉडेल ग्रामपंचायतीसाठी येळ्ळूरची झालेली निवड ही अभिमानास्पद बाब आहे. यामध्ये ग्रा. पं. सदस्य, कर्मचारी, शिक्षक, आरोग्य अधिकारी आशावर्कर्स आणि गावातील नागरिकांचा मोलाचा सहभाग आहे. त्यामुळे या दृष्टिकोनातून विकास कामांना अधिकाधिक गती देणे गरजेचे असून या मिळालेल्या संधीचं सोनं करण्याची जबाबदारी पुढेही सर्वांनी मिळून पेलुया. शैक्षणिक, आरोग्य आणि क्रीडा क्षेत्रात अगदी बारकाईने लक्ष घालून असेच एकजुटीने कार्यरत राहून मॉडेल ग्रामपंचायतचे उद्दिष्ट साध्य करायचे आहे, असे पाटील यांनी सांगितले.
बैठकीस ग्रा. पं. उपाध्यक्षा लक्ष्मी मासेकर, ग्रा. पं. सदस्य, सदस्या, पीडीओ अरुण नाईक, अधिकारी वर्ग, गावातील शाळेचे शिक्षक, अंगणवाडी शिक्षक आणि आशा कार्यकर्त्या उपस्थित होत्या.