बेळगाव शहरात गाजावाजा होत असलेल्या धोकादायक पतंगाच्या मांजाच्या वापरावर ग्रामीण भागातही बंदी व्हावी यासाठी जनजागृतीला सुरुवात झाली असून या कामी येळ्ळूर ग्रामपंचायतीने सर्वप्रथम पुढाकार घेतला आहे.
बेळगाव शहरात पतंगाच्या धारदार मांजामुळे दुर्घटना घडण्याचे प्रमाण वाढले आहे. मांजामुळे नुकताच एका सहा वर्षीय बालकाचा मृत्यू होण्याबरोबरच एक मोटरसायकलस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.
या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने शहरात मांजा तयार करणे व त्याची खरेदी -विक्री यावर बंदी घातली आहे. तालुक्याच्या ग्रामीण भागातील गावांमध्येही पतंग उडवण्याची क्रेझ आहे. त्यामुळे जीवघेण्या मांजाचा धोका ग्रामीण भागातील मुले व लोकांना देखील असल्यामुळे येळ्ळूर ग्रामपंचायतीने त्याबाबत फिरत्या वाहनावरून गावात जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे.
बेळगाव शहर व तालुक्यात पतंग उडवताना मांजा दोऱ्यामुळे अनेक अपघात घडत आहेत. तसे अपघात आपल्या गावात घडू नयेत यासाठी गावातील सर्व दुकानदारांनी या घातक दोऱ्याची विक्री करू नये. सर्व सुज्ञ नागरिकांनी देखील आपल्या मुलांकडे लक्ष देऊन मांजाचा वापर टाळावा आणि मुलांची व इतरांचीही काळजी घ्यावी, ही कळकळीची विनंती असे आवाहन येळ्ळूर ग्रामपंचायतीतर्फे केले जात आहे.
जिल्ह्यातील मॉडेल ग्रामपंचायत बनण्याच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या येळ्ळूर ग्रामपंचायतच्या या स्तुत्य उपक्रमाचे अनुकरण इतर ग्रामपंचायतींनी करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.